मुंबई – पतंजली टूथपेस्टमध्ये माशांची हाडे (फिश बोन) असल्याप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी योगगुरू रामदेव यांच्यावर तिखट हल्ला चढवला आहे. कोलगेट आपल्या टूथपेस्टमध्ये मीठ असल्याचे सांगून आपल्या उत्पादनाची विक्री करते. पण बाबा रामदेव यांची पतंजली मात्र आपले टूथपेस्ट शाकाहारी असल्याचा दावा करत जनतेला मांसाहारी टूथपेस्ट विकते, असे ते म्हणालेत. पतंजलीच्या दिव्य दंत मंजनमध्ये मांसाहारी सामग्रीचा वापर करण्यात आल्याचा दावा एका तक्रारकर्त्याने केला आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, पतंजली आपल्या उत्पादनांवर हिरवे लेबल लावते. म्हणजे कंपनी आपले उत्पादन पूर्णतः शाकाहारी असल्याचा दावा करते. पण दिव्य दंत मंजनमध्ये फिश बोन अर्थात माशांची हाडे असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे या प्रकरणी ग्राहकांची फसवणूक होत असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. कोलगेट आमच्या टूथ पेस्टमध्ये नमक आहे, असे स्पष्ट सांगून आपले उत्पादन विकते. बाबा रामदेव यांची पतंजली मात्र आमची टूथपेस्ट शाकाहारी आहे असे सांगून, लोकांना फिश बोन (माशांची हाडे) युक्त मासांहारी टूथपेस्ट विकत आहे. हा बाबा रामदेव वर विश्वास ठेवणाऱ्या करोडो लोकांचा विश्वासघात आहे. त्यांनी लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन, शाकाहारी लोकांना मासांहरी उत्पादने विकली आहेत. पतंजली उत्पादने प्रमोट करणाऱ्या लोकांनी देखील 10 वेळा विचार करावा की, आपण आपले खिसे लोकांच्या श्रद्धेचा बाजार मांडून तर भरत नाही आहोत ना?, असे आव्हाड यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे. काय आहे प्रकरण? दिल्लीत वकील म्हणून कार्यरत असलेल्या वकील शाशा जैन यांनी पतंजलीला नोटीस धाडली आहे. शाशा जैन यांनी आपल्या नोटीससोबत महत्त्वाचे दस्तावेजही जोडले आहेत. या दस्तावेजात त्यांनी म्हटले आहे की, पतंजलीने दिव्य दंतमंजन शाकाहारी असल्याचा दावा केला आहे. त्यावर हिरव्या रंगाचे लेबलही लावले आहे. पण दिव्य दंत टूथपेस्टमध्ये “समुद्रा फेन’ वापरण्यात आले आहे. ही ग्राहकांची फसवणूक आहे. लेबलिंग नियमांचे उल्लंघन आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.