Pune : आधी ‘असंवेदनशील’ विधान, मग सारवासारव; स्वारगेट प्रकरणावरील ‘त्या’ विधानावर संजय सावकारेंची माफी, योगेश कदम म्हणाले..

पुणेः स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेनंतर सर्व स्तरातून घटनेच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे (वय ३६) याला पोलिसांनी गुणाट गावातून अटक केली आहे. त्याला काल दि. २८ फेब्रुवारीला शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाने १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणावर भाष्य करताना एखादी घटना घडली म्हणून महिला सुरक्षित नाहीत असं म्हणता येणार नाही. देशात म्हटलं तर घटना घडत असतात, अशा प्रकारचे असंवेदनशील वक्तव्य मंत्री संजय सावकारे यांनी केले होते. त्यांच्या या विधानामुळे त्यांच्यावर चौहूबाजूंनी टीकेची झोड उठवली जात होती. अखेर सावकारे यांनी या प्रकरणावर केलेल्या असंवेदनशील वक्तव्याप्रकरणी माफी मागितली आहे. माझ्या बोलण्याचा कोणताही तसा उद्देश नव्हता. माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला, असे स्पष्टीकरण सावकारे यांनी माध्यमांशी बोलताना दिले.
बलात्कार घडतात असं मी काही बोललेलो नाही. सर्वात आधी जर कोणाचं मन दुखावलं असेल तर मी माफी मागतो. माझ्या बोलण्याचा कोणताही तसा उद्देश नव्हता. पत्रकारांनी मला विचारलं होतं की तुमचं सरकार आल्यापासून महाराष्ट्रात महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे मी ते बोललो. पण माझ्या त्या विधानाचा विपर्यास करण्यात आला. तरी माझ्या विधानामुळे कोणाची मने दुखावली गेली असतील तर मी माफी मागतो, असे मंत्री संजय सावकारे म्हणाले.
गृहराज्यमंत्र्यांची ‘त्या’ विधानावर सारवासारव
स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये जी घटना घडली, ती घटना कुठलीही फोर्सफुली किंवा स्ट्रगल न झाल्यामुळे घडली. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी त्या ठिकाणी जवळ आसपास दहा ते पंधरा लोकं आजूबाजूला उपस्थित होते. पण कोणालाही शंका आली नाही, असे असंवेदनशील विधान गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वारगेट बसस्थानकाला भेट दिल्यानंतर केले होते. त्यांच्या या विधानावर ठाकरे गटाचे संजय राऊत आणि काँग्रेसचे विजय वड्टीवार यांनी हल्लाबोल केला.
या वक्तव्यावर योगेश कदम यांनी स्वारगेट बसस्थानकाची पाहणी केल्यानंतर रहदारीचा परिसर असून आमच्या भगिनीवर अत्याचार होत असताना कुणीच कसे मदतीसाठी आले नाही, हा प्रश्न मी पोलिसांना विचारला. त्यांनी मला जे उत्तर दिले, ते मी पत्रकार परिषदेत सांगितले. पण माझ्या विधानाचा विपर्यास केला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.





