Pune Crime : आधी गोळ्या झाडल्या, नंतर सपासप वार.. कोण आहे मृत रिक्षाचालक गणेश काळे? आंदेकर टोळीशी वैर काय?

पुणे : पुण्याच्या कोंढवा परिसरात पुन्हा एकदा गँगवॉरने डोके वर काढले असून, रिक्षाचालक गणेश काळे याची भरदिवसा हत्या करण्यात आली. आंदेकर टोळीतील चार जणांनी गणेशवर सहा ते सात गोळ्या झाडल्या तसेच कोयत्याने डोक्यात सपासप वार केले. ही घटना कोंढवा येथील खडी मशीन चौकात दुपारी घडली आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळी रक्ताचे थरारक चित्र पाहायला मिळाले.
गणेश काळे कोण? आंदेकर टोळीशी वैराची किनार
मयत गणेश काळे हा सोमा गायकवाड टोळीशी संबंधित समीर काळे याचा भाऊ असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. समीर काळे हा गेल्या वर्षी (१ सप्टेंबर २०२४) झालेल्या माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येप्रकरणात मुख्य आरोपी म्हणून शस्त्र पुरवठा केल्याबद्दल सध्या कारागृहात आहे. वनराज आंदेकर हत्येनंतर आंदेकर टोळीने बदला म्हणून गायकवाड-कोमकर गँगशी संबंधित व्यक्तींवर हल्ले चढवले.
गणेश काळे हा समीर काळेचा भाऊ होता, समीरने माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येसाठी पिस्तूल पुरवले होते. त्यामुळे या हत्येमागे टोळीयुद्धाची किनार असल्याचे मानले जात आहे. गेल्या वर्षी सोमनाथ गायकवाड टोळीने वनराज यांचा गोळीबार आणि कोयत्याने वार करून खून केला होता, ज्यामध्ये समीर काळेचा संबंध होता आता याच समीर काळेच्या भावाची हत्या करण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांसह पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या नेतृत्वात मोठी पोलिस टीम घटनास्थळी दाखल झाली. फॉरेन्सिक टीमने पुरावे जमा केले असून, संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू आहे. आंदेकर टोळीवर पूर्वीपासूनच पोलिसांचा घेरा घट्ट आहे; आयुष कोमकर हत्येनंतर बंडू आंदेकरसह १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
वनराजच्या खूनाच्या बदल्यातून हत्या?
रिक्षा चालक असलेल्या गणेश काळेला का संपवण्यात आलं याचा मोठा खुलासा झाला आहे. गणेशचा खून हा पूर्वनियोजित होता. वनराज आंदेकर याच्या खूनाच्या बदल्यातून हे कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे. गणेश काळेचा खून करण्यासाठी दोन आरोपी त्याच्या मागावर होते. त्यांनी गणेशला रिक्षात बसू दिले, काही अंतर कापल्यानंतर त्यांनी गणेशवर हल्ला केला.
पुणे शहरात दहशतीचे वातावरण
पुण्यात गेल्या वर्षापासून आंदेकर-गायकवाड-कोमकर टोळ्यांमधील वैरामुळे अनेक हत्याकांड घडली आहेत. वनराज आंदेकर हत्येनंतर टिपू पठाण टोळीनेही आंदेकरांना मदत केल्याचे तपासात समोर आले होते. पोलिसांनी गुन्हेगारीला शंभर वेळा विचार करण्याचा इशारा देताना, अशा घटनांना माफी नाही, असे स्पष्ट केले आहे. या हत्येमुळे पुणे शहरात दहशतीचे वातावरण असून, पोलिस नाकाबंदी वाढवली आहे.





