शैक्षणिक गुणवत्ता वाढीला प्रथम प्राधान्य – शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह

पुणे ( डॉ. राजू गुरव) – राज्यातील शैक्षणिक गुणवत्ता वाढीला अधिक प्राध्यान्य देण्यात येणार आहे. त्याअनुंषगाने आवश्यक ते नाविन्यपुर्ण उपक्रम सक्षमपणे राबविण्यात येणार आहे. याबरोबरच शालेय शिक्षण विभागातील सर्व कामकाज ऑनलाईन पध्दतीने व्हावे यासाठीही प्रयत्न करण्यात येणार आहे, अशी माहीती नवनियुक्त शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दै. प्रभातशी बोलताना दिली आहे.
शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी शिक्षण विभागाच्या कामकाजाला शिस्त लावण्याच्या दृष्टीने सतत प्रयत्न केले. शिक्षण आयुक्त पदाचा मांढरे यांचा पावणेतीन वर्षांचा कालावधी पुर्ण होताच त्यांची क्रिडा आयुक्तपदी बदली करण्यात आली. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापुर्वीच त्यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर आता नवीन वर्षात त्यांची कृषि आयुक्त पदी नुकतीच पुन्हा नुकतीच बदली करण्यात आलेली आहे. दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव शिक्षण आयुक्त पदी सचिंद्र प्रताप सिंह यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सचिंद्र प्रताप सिंह यांनी शिक्षण आयुक्त पदाची सूत्रे स्विकारली आहे.
सचिंद्र प्रताप सिंह यांनी शिक्षण विभाग व त्यातील विविध विभागांचे कामकाज समजून घेण्यासाठी विविध कार्यालयांना भेटी देत अधिकारी यांच्या बैठका घेण्याचा धडाकाच लावलेला आहे. अधिकारी यांची ओळख परेडही घेतली आहे. कोणते अधिकारी कोणते व काय काय काम करतात यांची माहिती त्यांनी करुन घेतली आहे. विविध कार्यालयाचे संचालक, शिक्षण आयुक्तालय, प्राथमिक शिक्षण संचालक, माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालय यांच्या बैठकाही घेण्यात आल्या. आता योजना शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, बालभारती, राज्य मंंडळ, पुणे बोर्ड, पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयांच्या बैठाका घेण्यात येणार आहे. त्यानंतर विभागस्तरावरही बैठका घेण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
मांढरे यांनी सुरू केलेले उपक्रम पुर्ण करण्यात येणार आहेत. याबरोबरच शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी काही नवीन उपक्रमही राबविण्याबाबत चाचपणी करण्याचा नवीन शिक्षण आयुक्तांचा मानस आहे. कार्यालयीन कामकाम पेपरलेस व गतीमान पध्दतीने व्हावे यासाठी प्रयत्न करावेच लागणार आहेत. ऑनलाईन कामकाज व सेवा पुरविण्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. अधिकारी, कर्मचारी यांनी वेळेत येवून वेळेतच कामेही पुर्ण करावी लागणार आहेत. या अनुषंगाने नवीन शिक्षण आयुक्तांनी अधिकारी यांना सूचनाही दिलेल्या आहेत.
“शालेय शिक्षण विभागाचा खुप बारकाईने अभ्यास करण्यात येणार आहे. किमान एक महिनाभर हा विभाग समजून घेण्यासाठी लागणार आहे. त्यानंतर आवश्यकतेनुसार कामकाज पध्दतीत सुधारणात्मक बदलही करण्यात येणार आहे. विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानूनच विभागाचे कामकाज चालले पाहिजे यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.”
– सचिंद्र प्रताप सिंह, शिक्षण आयुक्त


