Pune: शिक्षण आयुक्तांकडून अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिस्तीचे धडे

पुणे – शालेय शिक्षण विभागातील सर्वच कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्या हजेरीसाठी बायोमेट्रिक प्रणालीचा अवलंब करणे बंधनकारक करण्यात आले आहे. कार्यालयात वेळेत न येणाऱ्या व विनापरवानगी गैरहजर राहणाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. शिक्षण आयुक्तांकडून अधिकारी, कर्मचारी यांना शिस्तीचे धडेही देण्यात येत आहेत.
शिक्षण आयुक्त पदाची सूत्रे हाती आल्यानंतर सचिंद्र प्रताप सिंह यांनी कार्यालयांना भेटी देण्याचा व बैठकांचा धडाका लावला आहे. कामकाजात जलद गती व पारदर्शकता आणण्यासाठी शिक्षण आयुक्तांनी अधिकारी, कर्मचारी यांना महत्वपुर्ण सूचनाही दिलेल्या आहेत. केवळ कार्यालयात बसून फायली रंगविण्याएवजी फिल्डवर जावून शाळा भेटी करण्याचा व शैक्षणिक गुणवत्ता तपासण्याबाबतचे आदेशही त्यांनी दिलेले आहेत. शाळा भेटींचे सवीस्तर अहवाल मागवुन त्याची तपासणीही केली जाणार जाणार आहे.
अधिकारी, कर्मचारी कार्यालयात वेळेत उपस्थित राहत नाहीत. ते कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत अन्यत्र गायब होत असल्याचेही अनेकदा निदर्शनास येते. अधिकारी, कर्मचारी यांनी कार्यालयात वेळेत यावे यासाठी शिक्षण आयुक्तांनी कारवाईची छडीच हाती घेतली आहे. सर्वांनी वेळेवर कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. आदेशाचे पालन केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशाराही त्यांनी दिलेला आहे.
सर्व कार्यालयातील बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली कार्यान्वित करुन त्याचा नियमित वापर करण्याची सक्त ताकीद अधिकारी, कर्मचारी यांना देण्यात आलेली आहे. कार्यालयात येताना, कार्यालयातील दुपारी जेवणाच्या वेळी तसेच सायंकाळी कार्यालय सोडताना असे तीन वेळा बायोमेट्रिक उपस्थिती प्रणालीचा वापर करावा लागणार आहे. कार्यालयीन वेळेचे पालन करणे आवश्यक आहे. महिन्यात दोन पेक्षा जास्त वेळा उशिरा उपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची तिसऱ्या वेळी नियमानुसार एक नैमित्तीक रजा खर्ची टाकली जाईल. विनापरवानगी अनुपस्थित राहणाऱ्या व वारंवार उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
कार्यालयीन वेळेत वरिष्ठांच्या परवानगीशिवाय कार्यालय सोडून बाहेर जाता येणार नाही. वरिष्ठांच्या पूर्वपरवानगीने रजा मंजूर करुनच रजा घ्यावी लागणार आहे. कर्मचाऱ्यांनी सोपविलेल्या कार्यभाराचे सुयोग्य नियोजन करुन कामकाज पूर्ण करणेबाबतची खबरदारी घ्यावी लागणार आहे. याबाबत शिक्षण आयुक्तालयाकडूनही आदेश जारी करण्यात आले आहेत.


