झारखंड : झारखंडमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. चतरा येथे भाजप नेत्याची गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली आहे. भाजप नेत्याची हत्या अतिरेक्यांनीच केली असावी, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला आहे. चतरा येथील तांडवा येथील लेंबुआ गावात राहणारे भाजप नेते विष्णू साओ यांची हत्या करण्यात आली आहे. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सकाळी आठच्या सुमारास काही लोक विष्णू साव यांच्या घरी आले आणि त्यांना सोबत घेऊन घरातून बाहेर नेले आणि नंतर गळा चिरून त्यांची हत्या केल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले. घरापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर ही हत्या करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. दरम्यान, मृत भाजप नेता हा एनआयएच्या एका खटल्यातही साक्षीदार होता, यातूनच हा खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या हत्येचा आरोप टीपीसी दहशतवाद्यांवर केला जात आहे. टीपीसीच्या अतिरेक्यांनी आधी भाजप नेत्याचे अपहरण केले आणि नंतर गळा चिरून ही हत्या घडवून आणली, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.