मुंबईत जीबीएसमुळे झालेल्या पहिल्या मृत्यूची नोंद; राज्यात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू

मुंबई : गुलेन बॅरे सिंड्रोमची (जीबीएस) लागण झालेल्या मुंबईतील एका रुग्णाचा आज मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. मनपाच्या नायर रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या ५३ वर्षीय रुग्णाचा जीबीएस व्हायरसमुळे मृत्यू झाल्याच्या माहितीला मनपा आयुक्तांनी दुजोरा दिला आहे. या मृत्यूसह जीबीएसची लागण झाल्याने मृत्यू झालेल्यांचा राज्यातील आकडा आता ८ वर पोहोचला आहे.
वडाळा परिसरातील रहिवासी आणि रुग्णालयात वॉर्ड बॉय म्हणून काम करणारा हा रुग्ण पंधरा दिवसांपूर्वी पुण्याला भेट देऊन आला होता. जिथे जीबीएसचा प्रादुर्भाव झाला आहे. त्याला २३ जानेवारी रोजी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तो अनेक दिवसांपासून गंभीर स्थितीत होता आणि मंगळवारी त्याचा मृत्यू झाला, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्हा आणि आजूबाजूच्या परिसरात जीबीएसचे रुग्ण सापडल्याने काहीसे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईत गेल्या शनिवारी या व्हायरसचा पहिला रुग्ण आढळून आला होता. अंधेरी परिसरातील एका ६४ वर्षीय महिलेला जीबीएसची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते.
राज्यात पुणे जिल्ह्यातच सध्या या व्हायरसचे सर्वाधिक १९७ रुग्ण आढळून आले आहेत. पण आजाराला घाबरण्याची काहीच गरज नाही, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. दरम्यान, जीबीएस हा आजार संसर्गजन्य नसून नागरिकांनी अजिबात घाबरण्याची गरज नाही असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले आहे. या आजाराचा सामना करण्यासाठी मुंबई महापालिकेचा आरोग्य विभाग सज्ज असून व्हेंटिलेटरसह १५० आयसीयू बेड्सची व्यवस्था केली आहे.

