पडळकरांवर बारामतीत पहिला गुन्हा दाखल

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविरुद्ध केलेले विधान भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांना भोवले आहे. बारामती शहर पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. 25) त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बारामती शहर पोलिसांना या संदर्भात निवेदन सादर केले होते. त्यांच्या निवेदनाची दखल घेऊन पडळकरांवर गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष अमर धुमाळ यांनी बारामती शहर पोलिसात फिर्याद नोंदवली आहे.
पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी पडळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलेला आहे.
दरम्यान, नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे, पंचायत समिती सभापती नीता बारवकर, गटनेते सचिन सातव, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, युवक अध्यक्ष अमर धुमाळ, महिला अध्यक्ष वनिता बनकर व अनिता गायकवाड, बाळासाहेब तावरे, मदन देवकाते, नवनाथ बल्लाळ, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, माजी नगराध्यक्ष योगेश जगताप व सुभाष सोमाणी यांनी जोपर्यंत पडळकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आपण पोलीस ठाण्यातून जाणार नाही अशी भूमिका घेतली. अखेर, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा लक्षात घेता पोलिसांनी गोपीचंद पडळकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला.





