पुर्व हवेलीत करोनाचा पहिला बळी

लोणी काळभोर(प्रतिनिधी) – हडपसर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असलेली कदमवाक वस्ती ( ता. हवेली ) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ७० वर्षीय वृद्ध महिला करोनाने मृत्युमुखी पडली आहे. पुणे – सोलापूर महामार्गावरील पुर्व हवेलीतील करोनाने घेतलेला हा पहिला बळी असल्याने परिसरात घबराहाटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. डी. जे. जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर महिलेला लघवीचा त्रास होत असल्याने ती हडपसर येथील एका खाजगी रूग्णालयात उपचारासाठी जात होती. २८ एप्रिल रोजी प्राथमिक आरोग्य केेंद्राच्या आशा वर्कर यांनी केलेल्या सर्व्हे मध्ये तिची प्रकृती चांगली असल्याचे निदर्शनास आले होते. २९ एप्रिल रोजी तिला लघवीचा त्रास होवू लागलेने कुटुंबियांनी तिला हडपसर येथील एका खाजगी रूग्णालयात उपचारासाठी नेले.
करोनाचा संशय आल्याने तेथील डॉक्टरांनी तिची करोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास तिचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला. उपचार सुरू असताना ३० एप्रिल रोजी मध्यरात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास या महिलेचा मृत्यु झाला. सदर वृद्ध महिला करोनाने मृत्युमुखी पडली असल्याचा अहवाल आज येताच आरोग्य अधिकारी डॉ डी. जे. जाधव यांनी आरोग्य कर्मचा-यांच्या मदतीने सर्व परिसरांचे निर्जंतुकीकरण केले. तसेच पोलीस प्रशासनाच्या सहाय्याने सदर महिलेच्या घरांतील सर्वजण व तिच्या सहवासात आलेले असे एकूण 26 जनांना तपासणी साठी पुण्यातील नवले रुग्णालयात पाठवले आहे. दरम्यान उरुळी कांचन व लोणी काळभोर सह पुर्व हवेलीत मागिल पंधरा दिवसाच्या कालावधीत आढळुन आलेला हा पाचवा रुग्ण आहे.
पुर्व हवेलीत भिती वाढली…
दरम्यान मागील पंधरा दिवसांच्या कालावधीत उरुळी कांचन येथील एका महिलेसह चार जण कोरोना बाधीत असल्याचे आढळुन आले आहे. या चार जणात सत्तेचाळीस वर्षीय महिला, संबधित महिलेवर उपचार करणारे कदमवाकवस्ती येथील खाजगी रुग्णालयातील एक डॉक्टर, दोन नर्सचा समावेश आहे. वरील डॉक्टर व महिलेच्या संपर्कात आलेले सव्वाशेहुन अधिक जण कोरोटांईन असतानाच या महिलेचा मृत्यु झाल्याची बाब पुढे आल्याने पुर्व हवेलीत भितीचे वातावरण पसरले आहे.





