Firing On Police: ७० चोरीचे गुन्हे अन् पोलिसांवर गोळीबार; उसाच्या शेतातून पळालेला सराईत गुन्हेगार अखेर जेरबंद
Firing On Police: ७० हून अधिक चोरीचे आणि दोन गोळीबाराचे गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार जेरबंद; ५१ हजारांचे पिस्टल आणि काडतूस जप्त.

Firing On Police – पोलिसांवर गोळीबार करून उसाच्या शेतातून पसार झालेला आणि तब्बल ७० हून अधिक चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला सराईत गुन्हेगार मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने रचलेल्या अचूक सापळ्यात अडकला. आरोपीकडून देशी बनावटीचे पिस्टल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. शेखर संभाजी जाधव (वय २५, रा. लातूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून सुमारे ५१ हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ मे रोजी दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेखर जाधव आणि त्याच्या तीन साथीदारांनी गोळीबार करत खुनाचा प्रयत्न केला. या घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाले होते. तपासादरम्यान आरोपी शेखर जाधव आणि त्याचा साथीदार मुस्तफा ऊर्फ भाईजान हे रांजणगाव परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र पोलिसांचा माग लागल्याचे लक्षात येताच आरोपींनी थेट पोलीस पथकावर गोळीबार करीत पलायन केले.
या प्रकरणी रांजणगाव पोलीस ठाण्यातही स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी शेखर जाधव हा रविवारी (दि. १४ जून) संध्याकाळी दिघीतील मोझे शाळेसमोरील मोकळ्या मैदानात येणार असल्याची गोपनीय माहिती मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग देवकाते यांच्या पथकाने परिसरात सापळा रचत आरोपीला अटक केली. त्याच्यावर ७० हून अधिक चोरीच्या गुन्ह्यांची नोंद आणि दोन गोळीबाराच्या गुन्ह्यांची नोंद आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर आयुक्त सारंग आवाड, उपायुक्त रोहिदास पवार, सहायक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, सहायक निरीक्षक पांडुरंग देवकाते, गोरक्षनाथ बालवडकर, उपनिरीक्षक महेश खांडे आणि त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.





