पहाटेच्या सुमारास अफगाण-पाक सीमेवर गोळीबार

पेशावर : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान दरम्यानच्या सीमेवर दोन्ही बाजूंच्या सैनिकांनी एकमेकांवर गोळीबार केला आहे. पाकिस्तानच्या वायव्येकडील महत्वाच्या बॉर्डर क्रॉसिंगवर हा गोळीबार झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तालिबानी सुरक्षा रक्षकांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास चिथावणीखोरपणे गोळीबार केला. त्याला पाकिस्तानकडून प्रत्युत्तर दिले गेले.
मात्र दोन्ही बाजूंच्या सैनिकांकडून झालेल्या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे पाक अधिकाऱ्याने सांगितले. मात्र तालिबान सरकारकडून या गोळीबाराबद्दल कोणतीही टिप्पणी करण्यात आलेली नाही. ही सीमा दोन्ही देशांमधील मतभेदांमुळे गेल्या आठवड्याभरापासून बंद आहे. बॉर्डर क्रॉसिंगच्या परिसरात अफगाणी बाजूंकडून नवीन चौक्या उभारल्या जात आहेत.
त्याला पाकिस्तानने आक्षेप घेतल्यामुळे गेल्या ११ दिवसांपासून ही बॉर्डर क्रॉसिंग बंद आहे. यापुर्वी देखील तोरखाम आणि नैऋत्येकडील चमन बॉर्डर क्रॉसिंग देखील बंद करण्यात आले होते. या बॉर्डरवर दोन्ही बाजूंकडून गोळीबार होण्याच्या घटना पुर्वी वारंवार घडल्या होत्या. तोरखाम सीमेवरून दररोज हजारो मालवाहू ट्रकची वाहतूक होत असते. सीमा बंद केल्यामुळे शेकडो ट्रक सीमेवर अडकून पडले आहेत.





