“मी गोळीबार केला नाही, शिंदे गटात गेल्यामुळे मला बदनाम करण्याचा प्रयत्न”

मुंबई – मुंबईतील प्रभादेवी येथे शिवसेना आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. यावेळी धक्काबुक्की करण्यात आली. यादरम्यान तेथे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा त्यांच्यावर आरोप केला जात आहे. त्यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन, मी गोळीबार केला नाही, एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलो म्हणून माझ्यावर आरोप केला जातोय असे शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, सरवणकर यांनी दोन वेळेस गोळीबार केला असा आरोप करण्यात येत आहे. तसेच शिवसेनेने केलेल्या दाव्यानुसार सरवणकर यांच्या गोळीबारात शिवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत आणि एक पोलीस अधिकारी बचावला असल्याचे म्हंटले आहे. दरम्यान, गोळीबार प्रकरणी सरवणकर यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरवणकर यांनी पत्रकार परिषदेत म्हंटले की, सणावेळी असे एकमेकांना डिवचण्याचे प्रकार झाले नाही पाहिजे. गणपती विसर्जनादिवशी जे झालं ते तेथेच संपलं होतं मग पुढे विषय वाढवायला नको होता. ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला. ही माहिती मिळाल्यानंतर मी तेथे गेलो होतो. माझ्या हातून गोळीबार झालेला नाही, शिंदे यांच्यासोबत गेलो म्हणून माझ्यावर आरोप केले जात आहेत, या प्रकरणाला वेगळे वळण देऊन मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय, असे सरवणकर यांनी म्हंटले आहे.





