Khan Sir Video : मोठी खळबळ.! खान सरांच्या कोचिंग क्लासवर गोळीबार; संस्था उडवून देण्याची धमकी, पोलिसांकडून तपास सुरू
खान सर यांच्या कोचिंग संस्थेवर यापूर्वीही हल्ला झाला होता. २०१९ मध्ये त्यांच्या संस्थेवर देशी बॉम्ब फेकण्यात आल्याची घटना घडली होती. त्या हल्ल्यात मालमत्तेचे नुकसान झाले होते.

Khan Sir Coaching Institute Firing : बिहारची राजधानी पटना येथील मुसल्लहपूर हाट परिसरात प्रसिद्ध शिक्षक आणि युट्यूबर खान सर यांच्या कोचिंग संस्थेबाहेर मंगळवारी रात्री गोळीबाराची घटना घडली.
या घटनेत एका सुरक्षा रक्षकाला दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, कोचिंग संस्थेजवळ काही अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. काही वृत्तांमध्ये पाच ते दहा राऊंड फायरिंग झाल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच कोचिंग संस्थेच्या परिसरात तोडफोड झाल्याच्याही बातम्या समोर आल्या आहेत.
घटनेनंतर खान सर यांनी माध्यमांशी बोलताना आपण घटनास्थळी उपस्थित असल्याचा दावा केला. त्यांनी सांगितले की, गोळीबाराच्या वेळी त्यांनी स्वतः अनेक राऊंड फायरिंग होताना पाहिली. यावेळी त्यांनी काही प्रतिस्पर्धी कोचिंग संस्थांवर गंभीर आरोप करत, कमी शुल्कात शिक्षण देणे आणि विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर यश हे काही संस्थांना खटकत असल्याचे म्हटले.
#WATCH | Patna, Bihar: Educator Khan Sir says, “… The main issue seems to be that why are we teaching for such low fees? Why are we getting such massive results? We appeal to the administration to keep security concerns in mind, recognizing that the poor, too, have the right to… https://t.co/5fSeoroGWH pic.twitter.com/wwxRMZCyxl
— ANI (@ANI) June 2, 2026
खान सर यांच्या मते, अलीकडेच जाहीर झालेल्या बिहार पोलीस भरती परीक्षेच्या निकालात त्यांच्या संस्थेतील मोठ्या संख्येने विद्यार्थी यशस्वी झाले. त्यानंतर काही समाजकंटकांकडून धमक्या मिळू लागल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र, या आरोपांना अद्याप पोलिसांकडून दुजोरा देण्यात आलेला नाही.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले असून प्रत्यक्षदर्शी आणि जखमी सुरक्षा रक्षकाचे जबाब नोंदवले जात आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सर्व शक्यतांचा तपास सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. गोळीबारामागील नेमके कारण आणि आरोपींची ओळख अद्याप समोर आलेली नाही.
विशेष म्हणजे, खान सर यांच्या कोचिंग संस्थेवर यापूर्वीही हल्ला झाला होता. २०१९ मध्ये त्यांच्या संस्थेवर देशी बॉम्ब फेकण्यात आल्याची घटना घडली होती. त्या हल्ल्यात मालमत्तेचे नुकसान झाले होते, मात्र कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.





