Pimpri-Chinchwad: मध्यरात्रीपर्यंत फटाक्यांचा दणदणाट; नियमांची ऐशीतैशी!
रात्री दहानंतरही आतषबाजी - आगीच्या घटनांनंतरही कारवाईचा अभाव

पिंपरी – फटाके फोडण्यासाठी वेळेचे बंधन असतानाही पिंपरी-चिंचवड शहरात मध्यरात्रीपर्यंत आतषबाजी सुरू होती. रस्त्यावर आणि रात्री दहानंतर फटाके फोडण्यास मनाई असतानाही अनेक भागांत नियम धाब्यावर बसविण्यात आले. मोठ्या आवाजाचे फटाके आणि आकाशात उडविण्यात येणाऱ्या रॉकेटमुळे ध्वनी व वायुप्रदूषणात भर पडली.
फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे १३ दिवसांमध्ये शहरात १६० आगीच्या घटनाही घडल्या. मात्र, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी ठोस कारवाई केल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे प्रशासनाच्या नियंत्रण व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
फटाक्यांमुळे होणारे ध्वनी आणि वायुप्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाने रात्री दहानंतर आतषबाजी करण्यास मनाई केली होती. तसेच न्यायालयानेही रस्त्यावर फटाके फोडण्यावर निर्बंध आणले होते. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला होता.
मात्र, प्रत्यक्षात या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही. पिंपरी, चिंचवड, निगडी, आकुर्डी, वाकड, पिंपळे गुरव, चिखली आणि भोसरी परिसरात मध्यरात्र उलटून गेल्यानंतरही फटाके फोडले जात होते. मोठ्या आवाजामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना त्रास सहन करावा लागला.
फटाक्यांच्या आतषबाजीमुळे दिवाळीच्या १३ दिवसांमध्ये १६० ठिकाणी शहरात आगीच्या घटना घडल्या. त्यापैकी लक्ष्मी पूजनच्या दिवशी तब्बल ७५ ठिकाणी आगी लागल्या होत्या. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला. याशिवाय कचराकुंड्या आणि सुक्या गवताला आग लागण्याच्या घटनाही घडल्या. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला.
शहरात अनेक भागांत रात्री उशिरापर्यंत फटाके फुटत असताना पोलीस गस्त नेमकी कुठे होती, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी असतानाही प्रत्यक्षात किती जणांवर कारवाई झाली, याची माहिती पोलीस प्रशासनाकडून मिळू शकली नाही. मात्र याबाबत एकही गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलीस उपायुक्तांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांनी या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाने केवळ आदेश काढून जबाबदारी संपत नाही. त्यांची प्रभावी अंमलबजावणी होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. रात्रीच्या वेळी विशेष गस्त वाढवावी, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करावी आणि तक्रार निवारण यंत्रणा कार्यक्षम करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
वर्षभर सुरू असते आतषबाजी
रात्री दहा वाजल्यानंतर फटाके फोडण्यावर बंदी आहे. मात्र गल्लीबोळातील चिरकूट भाई आणि त्यांच्या बगलबच्च्यांचा वाढदिवस मध्यरात्री फटाके फोडून साजरा होतो. मात्र पोलिसांनी आत्तापर्यंत फक्त तलवारीने केक कापणाऱ्यांवर कारवाई केली आहे.
सांगवी पोलीस ठाण्याच्या समोरच एका पोलीस कर्मचाऱ्याचा वाढदिवस मध्यरात्री रस्त्यावर फटाके फोडून साजरा केला होता. याबाबत सोशल मीडियावर रिल्स व्हायरल झाल्यानंतर पोलीस आयुक्तांनी संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते.





