चालत्या ST बसमध्ये आग! प्रवाशांची प्रचंड पळापळ, धुराचे लोट, आरडाओरड अन् …

नेवासे (अहमदनगर) : कोपरगांव ते बीड मार्गावरील राज्य परिवहन महामंडळाच्या चालत्या बसमध्ये शुक्रवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी अचानक शॉर्टसर्किट होऊन भीषण आग लागली. बसमधून धुराचे लोट बाहेर पडताच प्रवाशांचा एकच गोंधळ उडवला. आरोळ्या ठोकत प्रवासी जीव वाचवण्यासाठी धडपडू लागले. ही घटना नेवासे येथील प्रसिद्ध पावन गणपती मंदिरासमोर सायंकाळी ६ वाजता घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोपरगांव-बीड बस (क्र. MH-40 AQ-6027) नेवाशाहून पुढे निघाली होती. काही क्षणांतच बसमधून प्रचंड धूर बाहेर पडू लागला आणि विजेच्या तारांमध्ये ठिणग्या उडाल्या. बस चालकाने प्रसंगावधान दाखवत लगेच बस रस्त्याच्या कडेला घेतली.
बसमधून धुराचे लोट बाहेर पडताच रस्त्यावरून जाणारे-येणारे नागरिकही घाबरले. पावन गणपती मंदिर परिसरातील दुकानदार, भाविक आणि नागरिकांनी बसकडे धाव घेतली. सर्वांनी मिळून बसमधील सुमारे ४०-४५ प्रवाशांना तातडीने खाली उतरवले. अग्निशमन दल येण्याआधीच स्थानिकांनी परिस्थिती आटोक्यात आणली.
सुदैवाने एकाही प्रवाशाला इजा नाही, पण सर्वजण प्रचंड घाबरले होते. काही महिला व लहान मुले रडत होती, तर काही प्रवासी हादरलेल्या अवस्थेत बसच्या बाहेर उभे होते. काही वेळाने नेवासा आगाराची दुसरी बस घटनास्थळी दाखल झाली आणि सर्व प्रवाशांना सुखरूप पुढे रवाना करण्यात आले.





