Pune District : फायरिंग; फरार आरोपी अटकेत, सासवड पोलिसांची कारवाई
Pune District : न्यायालयाने त्याला २६ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सासवड पोलीस स्टेशनमध्ये (दि.९) मार्च रोजी राहुल सुभाष काळे यांनी फिर्याद दाखल केली होती.

सासवड : सासवड पोलीस स्टेशन व पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथक यांच्या संयुक्त कारवाईत फायरिंग, खंडणी व इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या दिगंबर दशरथ शेंडकर (रा. चांबळी, ता. पुरंदर) याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला २६ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सासवड पोलीस स्टेशनमध्ये (दि.९) मार्च रोजी राहुल सुभाष काळे यांनी फिर्याद दाखल केली होती.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, आरोपी दिगंबर शेंडकर व सुमित उर्फ मुन्ना रवी कामठे यांनी चांबळी येथील त्यांच्या हॉटेलवर येऊन तोडफोड केली. तसेच फिर्यादीची पत्नी व हॉटेलमधील कामगारांना लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी हॉटेलच्या कॅश काउंटरमधील सुमारे ३० ते ३२ हजार रुपये जबरदस्तीने नेल्याचा आरोप आहे. यापूर्वी धमकावून वेळोवेळी अडीच लाख रुपयांची खंडणी उकळल्याचाही आरोप फिर्यादीने केला आहे.
सासवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी दिगंबर शेंडकर फरार होता. त्याचा शोध घेण्यासाठी सासवड पोलिसांचे गुन्हे शोध पथक आणि दहशतवाद विरोधी पथक त्याच्या मागावर होते. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीवर सासवड, जेजुरी, राजगड व शिरूर पोलीस ठाण्यांमध्ये खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोडा, मारहाण यांसारख्या गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. तो २०११ पासून गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दहशतवाद विरोधी शाखा, पुणे ग्रामीणच्या पथकाने सापळा रचून आरोपी दिगंबर शेंडकर याला सासवड परिसरातून ताब्यात घेतले. त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे हे करीत आहेत.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर व सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. दहशतवाद विरोधी पथकाचे कर्मचारी गायकवाड, कदम, शिंदे आणि शेख यांनी कारवाईत सहभाग घेतला.





