पुण्यातील नवले ब्रिजजवळ सन ओरियन सोसायटीत आग; जीवितहानी नाही

पुणे : शहराच्या नवले ब्रिजजवळील कुदळेबाग परिसरातील सन ओरियन सोसायटीत सोमवारी (१७ नोव्हेंबर) दुपारी अचानक आग लागल्याची घटना घडली. फ्लॅट क्रमांक ३०२ बी मधील बेडरूमध्ये आग लागली होती. धूर वाढल्याने शेजारच्या ३०५ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये एक महिला गॅलरीत अडकली होती. नवले अग्निशमन केंद्रातील पथकाने तात्काळ पोहोचून दरवाजा उघडत महिलेला सुखरूप बाहेर काढले. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अग्निशमन दलाच्या जवानांनी होज पाइप लावून बेडरूममधील आग ताबडतोब नियंत्रणात आणली. सुरक्षिततेसाठी घरातील तीन गॅस सिलेंडर बाहेर काढले, तसेच महत्त्वाची कागदपत्रे आणि साहित्यही वाचवले. आग पूर्णपणे विझवून परिसर सुरक्षित केल्याची माहिती दलाने दिली आहे. प्राथमिक तपासात आग विद्युत शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे, तर नेमके कारण जाणून घेण्यासाठी तपास सुरू आहे.
या घटनेमुळे सोसायटीतील रहिवाशांमध्ये थोडासा घबराटीचा वातावरण निर्माण झाला, पण अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. पुण्यात अलीकडे वाढत असलेल्या आगीच्या घटनांमुळे रहिवाशांना अग्निसुरक्षा उपाययोजना मजबूत करण्याची गरज आहे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.





