Loni Kalbhor : कदमवाकवस्तीत जलजीवन मिशनच्या पाइपांना आग
Loni Kalbhor : जवानांनी तातडीने आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यांच्या तत्परतेमुळे आग आटोक्यात आली आणि संभाव्य मोठे नुकसान टळले. आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

लोणी काळभोर : पूर्व हवेलीतील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील पालखी स्थळ परिसरात जलजीवन मिशन योजनेसाठी साठवून ठेवलेल्या प्लास्टिक पाइपांना सोमवारी (दि. १२) दुपारी साडेचारच्या सुमारास अचानक आग लागली. या दुर्घटनेत लाखो रुपयांचे साहित्य जळून नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत काही मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे आग परिसरात पसरण्याचा धोका टळला.
कदमवाकवस्ती येथील पालखी स्थळावर ग्रामीण भागात नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या जलजीवन मिशन योजनेचे पाइप साठवून ठेवण्यात आले होते. साधारण दोन वर्षांपासून या ठिकाणी पाइपांचा मोठा साठा होता. सोमवारी दुपारी अचानक आग लागल्यानंतर काही वेळातच आगीने उग्र रूप धारण केले. परिसरात धुराचे मोठमोठे लोट पसरल्याने नागरिकांचे लक्ष या घटनेकडे वेधले गेले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन आणि अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.
जवानांनी तातडीने आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यांच्या तत्परतेमुळे आग आटोक्यात आली आणि संभाव्य मोठे नुकसान टळले. आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या घटनेत जलजीवन मिशनच्या साहित्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीचे कारण आणि नुकसानीचा नेमका आकडा तपासानंतर स्पष्ट होणार आहे. जलजीवन मिशन ही ग्रामीण भागातील घरांपर्यंत नळाद्वारे पिण्याचे पाणी पोहोचविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणारी महत्त्वाची योजना आहे. या योजनेसाठी साठवून ठेवलेल्या साहित्याला आग लागल्याने झालेल्या नुकसानीचा तसेच आगीच्या कारणांचा संबंधित प्रशासनाकडून तपास केला जात आहे.





