Jaipur SMS Hospital Fire : सरकारी रूग्णालयात अग्नितांडव; सहा रुग्णांचा होरपळून मृत्यू

जयपूर : राजस्थानची राजधानी जयपूरमधील सरकारी रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) अग्नितांडव घडले. त्या दुर्घटनेत होरपळून ६ रूग्ण मृत्युमुखी पडले. सवाई मानसिंह रूग्णालयातील आयसीयूमध्ये रविवारी रात्री उशीरा अचानकपणे आगीचा भडका उडाला. त्यावेळी आयसीयूमध्ये ११ रूग्ण दाखल होते. काही क्षणांत आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण आयसीयूला व्यापले.
त्यामुळे रूग्णांच्या मदतीसाठी धावलेल्यांना केवळ ५ रूग्णांनाच आयसीयूबाहेर काढणे शक्य झाले. मात्र, तिथे उपचार घेत असलेल्या २ महिला आणि ४ पुरूष रूग्णांना आगडोंबातून वाचवणे शक्य झाले नाही. आगीची माहिती समजल्यानंतर अग्निशमन बंब दाखल झाले. त्यांनी २ तासांत आग आटोक्यात आणली. तोपर्यंत रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आणि स्थानिकांनी इतर विभागांतील रूग्णांना रूग्णालयाबाहेर हलवले.
आगीचे नेमके कारण तातडीने समजू शकले नाही. सवाई मानसिंह रूग्णालय राजस्थानमधील सर्वांत मोठे सरकारी रूग्णालय आहे. तेथील दुर्घटनेच्या चौकशीसाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन केली. तसेच, मृतांच्या कुटूंबीयांना प्रत्येकी १० लाख रूपयांची भरपाई जाहीर केली. संबंधित दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले.





