पुणे जिल्हा | शिरुर शिक्षक पतसंस्थेला आग

शिक्रापूर (वार्ताहर)- तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे शिरुर तालुक्यातील शिक्षकांनी स्थापन केलेल्या शिरुर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे कार्यालय असून (दि.१७) रोजी रात्रीच्या सुमारास पतसंस्थेला अचानक आग लागून आगीमध्ये कागदपत्रांसह साहित्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. आगीचे कारण समजू शकले नाही.
तळेगाव ढमढेरे येथील शिरुर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे कार्यालयाला बुधवारी रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. नागरिकांना ही आग दिसल्यानंतर पतसंस्थेचे सचिव रामचंद्र नवले, संचालक संतोष विधाटे, व्यवस्थापक कांतीलाल ओव्हाण, शिक्षक उमेश धुमाळ, सचिन भुजबळ यांसह आसिनी शेजारील नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु केले. माहिती मिळताच हवालदार अमोल चव्हाण, लहानू बांगर, स्वप्नील गांडेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, शिक्षक उमेश धुमाळ व सचिन भुजबळ यांनी शेजारील पेट्रोलपंपमधून आग आटोक्यात आणण्याचे यंत्र आणून आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र, यावेळी आगीमध्ये पतसंस्थेच्या अहवाल, कागदपत्रे, स्टेशनरी यासह आदी साहित्यांचे नुकसान झाले. सचिव रामचंद्र नवले यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली आहे. पोलिसांनी आकस्मात जळीत प्रकरणी नोंद केली आहे. पुढील तपास हवालदार किशोर तेलंग हे करीत आहेत.




