Hingoli News: हिंगोलीत फटाक्याच्या गोडाऊनला आग; दोन जणांचा मृत्यू, सात जण गंभीर जखमी
Hingoli News: अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळविताना अडथळे

शिवशंकर निरगूडे
हिंगोली : शहरातील मारवाडी गल्ली भागात फटाक्याच्या गोदामाला आग लागल्याची घटना ५ ऑक्टोबरच्या रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत गंभीर भाजल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे आणि. सात ते आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. शेजारील चार ते पाच घरेही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने मोठे नुकसान झाले आहे.
मारवाडी गल्ली भागातील गोपाल बासटवार यांचे दुमजली घर असून, त्यांनी खालच्या मजल्यावर फटाक्याचा साठा करून ठेवला होता. तर वरच्या मजल्यावर ते कुटुंबासह राहतात. सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास फटाक्याच्या साठ्यास अचानक आग लागली. एकापाठोपाठ फटाक्यांचे स्फोट आणि धुराचे लोट बाहेर पडत होते. यादरम्यान परिसरातील नागरिकांनी बासटवार यांच्यासह शेजारील घरातील नागरिकांना बाहेर काढले. परंतु, यादरम्यान सात ते आठ जण भाजले.
काही क्षणातच या आगीने रौद्ररूप धारण केले आणि बासटवार यांच्या घरासह आजूबाजूची चार ते पाच घरेही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. घटनेची माहिती कळताच हिंगोली नगरपालिकेचे अग्निशमन दल तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत मात्र बासटवार यांचा फटाक्यांचा संपूर्ण गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला होता. तसेच आजूबाजूच्या घरातही आग पोहोचली होती. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आणि सात ते आठ जण भाजले आहेत.
एकापाठोपाठ फटाक्यांचे स्फोट
गोपाल बासटवार यांचे महात्मा गांधी चौकात होलसेल फटाका सेंटर असून, त्यांनी आपल्या घराच्या खालील मजल्यावर फटाक्याचा साठा करून ठेवला होता. फटाक्याच्या याच साठ्याला आग लागली. यादरम्यान फटाक्यांचे एकापाठोपाठ स्फोट होत होते. त्यामुळे अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळविताना अडथळे येत होते. परंतु, फटाक्यांच्या स्फोटात अग्निशमन दलाच्या वाहनालाच आग लागली. यामध्ये संपूर्ण वाहन जळून खाक झाले. तर दोन कर्मचारीही भाजल्याची माहिती आहे.





