Sonali Kulkarni : …अशी मिळाली ‘सम्माक्का’ची भूमिका; सोनालीने सांगितला तो खास किस्सा; नानीचं कौतुक करत शेअर केला अनुभव
Sonali Kulkarni : ‘द पॅराडाईज’ हा तेलुगू भाषेतील चित्रपट असल्याने इतर भाषिक कलाकारांसाठी संवाद आणि उच्चार आत्मसात करणं हे मोठं आव्हान होतं.

Sonali Kulkarni : दाक्षिणात्य अभिनेता नानीचा ‘द पॅराडाईज’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचे प्रेक्षकांकडून कौतुक होत असून, मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनेही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
तिच्या भूमिकेलाही प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सोनाली कुलकर्णीने ‘द पॅराडाईज’मध्ये तिची निवड कशी झाली, तसेच अभिनेता नानीसोबत काम करण्याचा तिचा अनुभव कसा होता, याबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केलं.
‘द पॅराडाईज’ हा तेलुगू भाषेतील चित्रपट असल्याने इतर भाषिक कलाकारांसाठी संवाद आणि उच्चार आत्मसात करणं हे मोठं आव्हान होतं. सोनालीसाठीही ही गोष्ट अडसर ठरली. तिला ‘सम्माक्का’ ही व्यक्तिरेखा साकारणं सोपं नव्हतं. विशेषतः तेलुगू भाषेतील कठीण संवाद प्रभावीपणे सादर करण्यासाठी तिला खूप मेहनत घ्यावी लागली.
याबद्दल बोलताना सोनालीने नानीचं विशेष कौतुक केलं. “तेलुगू भाषेतील कठीण संवाद मला सहजरीत्या बोलता यावेत, यासाठी नानीने मला मदत केली,” असं सोनालीने सांगितलं. नानीसोबत काम करताना मिळालेला हा अनुभव सोनालीसाठी खास ठरला.
सम्माक्का या पात्रासाठी तिची निवड कशी झाली याविषयी बोलताना सोनाली म्हणाली “सम्माक्का या भूमिकेसाठी कोणाला तरी माझं नाव सुचलं आणि मला तिथून फोन आला की, ‘तू ऑडिशनला किंवा मेकर्सना भेटायला येशील का?’ माझा ऑडिशन प्रक्रियेवर प्रचंड विश्वास आहे. कारण ऑडिशन म्हणजे, केवळ तुमची अभिनय क्षमता तपासणं नव्हे, तर मेकर्सना तुम्ही त्या पात्राच्या लूकमध्ये किंवा झोनमध्ये बसता का, हेही तपासायचं असतं. त्यासाठी मी हैदराबादला गेले. मला तेलुगू भाषा येत नव्हती. पण तिथल्या ऑडिशन आणि भेटीनंतर मेकर्सनी लगेचच त्या भूमिकेसाठी माझी निवड केली.”
पुढे नानीसोबत काम करण्याच्या अनुभवाबद्दल बोलताना सोनालीने नानीचं कौतुक केलं. ती म्हणाली “तेलुगू भाषेतील कठीण संवाद मला सहजरीत्या बोलता यावेत, यासाठी नानीनं मला मदत केली. काम करताना आमच्या मनात एकमेकांविषयी विश्वास निर्माण झाला. नानी सेटवर स्वतःला मोठा ‘स्टार’ किंवा ‘हीरो’ न समजता अगदी एका जवळच्या मित्रासारखा वागायचा. तो सेटवर प्रत्येकाची आणि सर्व गोष्टींची काळजी घ्यायचा. त्याच्या या वृत्तीमुळे माझ्या मनात त्याच्याबद्दल प्रचंड आदर आणि प्रेम निर्माण झालं.






