Financial Fraud : वॅलेंटिना इंडस्ट्रीजवर आर्थिक गुन्हे शाखेची रेड; २ हजार लोकांचे ४३ कोटी धोक्यात..वाचा सविस्तर
Financial Fraud : आर्थिक गुन्हे शाखेकडून कर्वे रोडवरील कार्यालयासह संचालकांच्या निवासस्थानी छापेमारी; महत्त्वाची कागदपत्रे पोलिसांच्या ताब्यात.

Financial Fraud – महिन्याला १ ते ५ टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून सामान्य नागरिकांसह अनेक गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी वॅलेंटिना इंडस्ट्रीजच्या दोन जणांविरोधात अलंकार पोलिसांत शनिवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अनुषंगाने त्यांच्या कार्यालयावर, तसेच निवासस्थानी आर्थिक गुन्हे शाखेकडून छापेमारी करत झाडाझडती घेऊन महत्त्वाची कादपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
याप्रकरणी वॅलेंटिना इंडस्ट्रीजचे संतोष बांदल आणि ज्ञानेश्वर अनंत चोरगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडे आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने अलंकार पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वॅलेंटिना इंडस्ट्रीजचे कार्यालय कर्वे रोड परिसरातील सक्सेस स्क्वेअर इमारतीत आहे. आरोपींपैकी एक जण सॅलिसबरी पार्क, तर दुसरा बिबवेवाडी परिसरात राहतो. आरोपींनी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी विविध गुंतवणूक योजना तयार केल्या होत्या.
या योजनांमध्ये कागदोपत्री १ टक्का, तर प्रत्यक्षात ५ टक्के परतावा देण्याचे खोटे आमिष दाखवण्यात आले होते. गुंतवणूकदारांना प्रलोभन देऊन आरोपींनी तब्बल ४३ कोटी २० लाख रुपयांच्या ठेवी स्वीकारल्या. त्यानंतर गुंतवणूकदारांना परतावा व मुद्दल देणे बंद केल्याने काहींनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली. हा सर्व प्रकार जुलै २०२२ ते एप्रिल २०२६ या कालावधीत घडला. याप्रकरणी शासनातर्फे अनियमित (अनधिकृत) ठेवी योजना बंदी कायदा, २०१९ च्या कलम २१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
शनिवारी दुपारी गुन्हा दाखल झाल्यानंतर बांदल व चोरगे यांच्या कार्यालयावर व राहत्या घरी झाडाझडती घेण्यात आली. प्राथमिक चौकशीत किमान दोन हजार गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचे समोर येत आहे. त्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे.
– विवेक मासाळ, पोलिस उपायुक्त, आर्थिक गुन्हे शाखा





