…अखेर पुण्यात पाणीकपात

पुणे : राज्यात मान्सूनने ओढ दिल्याने धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. शहरात पाणीकपात न केल्यास खडकवासला धरण साखळीतील साठा 15 जुलैपर्यंत पुरेल इतकाच राहील, असा निर्वाणीचा इशारा पाटबंधारे विभागाने महापालिकेला दिला होता. अखेर पालिका प्रशासनाने सोमवारपासून (दि.4 जुलै) शहरात दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी गुरुवारी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. तसेच पाण्याचे नियोजन कसे असेल, याचा आढावा घेतला. “शहरातील सध्याचा पाणीपुरवठा पाहता काही भागांत जास्त, तर काही भागांत कमी पाणीपुरवठा होतो. त्यामुळे वेळांमध्ये बदल करण्याऐवजी दिवसा आड पाणी देणे सोयीस्कर होणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे,’ असे आयुक्त कुमार यांनी सांगितले. खडकवासला धरणसाखळीची साठवण क्षमता सुमारे 30 टीएमसी आहे. पण, आता फक्त अडीच टीएमसी साठा शिल्लक आहे. तो 15 जुलैपर्यंत पुरेल अशा पद्धतीचे नियोजन होते. मात्र, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दडी मारल्याने हा साठा 30 जुलैपर्यंत राखीव ठेवण्याचे नियोजन आहे. त्यामुळे महापालिकेस शहरात 30 ते 35 टक्के पाणी कपात करणे अपरिहार्य असल्याने हा निर्णय घेण्यात
आला आहे.
सध्याच्या वेळापत्रकात बदल होणार
दिवसाआड पाणीपुरवठा करायचा असल्यास तीन-चार दिवस आधी पाणी वाटपाच्या नियोजनात बदल करावा लागतो. त्यामुळे महापालिकेकडून शुक्रवारी पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. प्रशासनाने सध्या तयार केलेल्या वेळापत्रकात काही बदल करण्यात आले असून ते अंतिम करून सुधारीत वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.





