Satara | झेडपीच्या योजनांचा लाभ मिळण्याचा अखेर मार्ग मोकळा

सातारा, (प्रतिनिधी) – सातारा जिल्हा परिषदेच्या विविध योजनांची अंमलबजावणी होण्यास जिल्हा परिषद प्रशासनाकडून विलंब होत होता. या योजनांसाठी विकसित करण्यात आलेल्या ॲपचे उ्दघाटन रखडल्याने लाभार्थींमधून नाराजी व्यक्त होत होती. याबाबत दै. ‘प्रभात’ने वृत्त प्रसिध्द केल्यानंतर दोन दिवसातच या ॲपचे उद्घाटन करण्यात आले.
आता जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा लाभ गतीने मिळण्यास मदत होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी लाभार्थींची निवड प्रक्रिया पूर्ण करुन त्यांना लाभ द्यावा, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी दिल्या आहेत.
सातारा जिल्हा परिषदेची राज्यातच नव्हे तर देशात ओळख असून शेतकऱ्यांसह विविध प्रकारच्या लाभार्थ्यांसाठी योजना राबवण्यात जिल्हा परिषद नेहमीच अग्रेसर राहिली आहे.
यावर्षी मात्र जिल्हा परिषदेला या योजनांचा विसर पडला असल्याने जुलै महिना संपला तरी अद्याप कोणत्याच विभागाच्या योजनांची प्रक्रिया राबवण्यात न आल्याने शेतकऱ्यांसह विविध विभागांतर्गत योजनांच्या लाभार्थींमधून नाराजी व्यक्त होत होती.
योजना ॲपद्वारे राबवण्याचा झाल्याने ॲपच्या उद्घाटनानंतर ही प्रक्रिया होणार असल्याचे प्रशासनकडून सांगण्यात येत होते. मात्र सुमारे दोन महिने ही प्रक्रिया रखडल्याने जिल्हावासियांमध्ये नाराजीचा सूर होता. याबाबत दैनिक प्रभातने आवाज उठवल्यानंतर दोन दिवसातच ॲपचे उद्घाटन करण्यात आले.
बुधवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांच्या हस्ते या ॲपचे उदघाटन करण्यात आले. यावेळी प्रकल्प संचालक संतोष हराळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले, अर्चना वाघमळे, क्रांती बोराटे, कार्यकारी अभियंता मोहसीन मोदी,
अरुणकुमार दिलपाक, कृषी विकास अधिकारी विजय माइनकर, जिल्हा समाजकल्याण अधिकारी नितीन उबाळे, यांत्रिकी विभागाचे उपअभियंता जितेंद्र लाडे, लेखाधिकारी राजेंद्र सादिगले, गटविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. प्राथमिक शिक्षिका सौ. अंजली गोडसे यांनी सूत्रसंचालन केले.
जिल्हा परिषदेच्या कृषी, पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण, समाजकल्याण आदी विभागांतर्गत काही योजनांची लाभार्थीं निवड ॲपद्वारे होणार आहे. काही योजना ऑफलाइन राबवण्यात येणार आहे. प्रत्यक्षात लाभार्थी निवड ड्रॉद्वारे होणार आहे. कृषी विकास अधिकारी विजय माइनकर यांनी हे ॲप विकसित करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे.
या ॲपमुळे लाभार्थींचा वेळ व पैसा वाचणार असून लाभार्थी मोबाइलद्वारे, संगणकावरुन अथवा महा इ सेवा केंद्रातून ऑनलाइन अर्ज करु शकतात. अर्ज करण्यासाठी तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी यायची गरज नाही. जास्तीत जास्त लाभार्थींनी या योजनांचा लाभ घ्यावा. – याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी





