Lonavala News: लोणावळ्यात अखेर अतिक्रमणांवर हातोडा; विरोध झुगारून नगर परिषदेकडून कारवाईला सुरुवात!
Lonavala News: अतिक्रमण कारवाईला टपरी व पथारीधारक संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला होता.

लोणावळा – लोणावळा शहरातील अतिक्रमणविरोधी कारवाईला अखेर सुरुवात झाली असून, नगर परिषदेच्या पथकाने आजपासून अतिक्रमणांवर थेट हातोडा चालवण्यास सुरुवात केली आहे. कुमार चौक परिसरातील कुमार रिसॉर्ट तसेच गणेश कॉर्नर येथील अतिक्रमणांवर नगर परिषदेच्या पथकाने पहिली कारवाई केली.
लोणावळा नगर परिषदेचे अतिक्रमण निर्मूलन अधिकारी मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणारी दुकाने, टपऱ्या तसेच अनधिकृत बांधकामे यापुढे टप्प्याटप्प्याने हटविण्यात येणार असल्याचे नगर परिषदेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, या अतिक्रमण कारवाईला टपरी व पथारीधारक संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला होता.
दोन ते तीन दिवसांपूर्वी संघटनांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. अतिक्रमण कारवाई तात्पुरती थांबवावी, तसेच योग्य नोटिसा देऊन केवळ वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणेच हटवावीत, हातावर पोट असणाऱ्या गोरगरिबांच्या टपरी, पथाऱ्यांचे आधी पुनर्वसन करावे तसेच ज्यांच्या दोन किंवा दोन पेक्षा जास्त टपऱ्या आहेत, ज्यांनी आपल्या टपऱ्या भाड्याने दिल्या आहेत त्यांच्यावर आधी कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली होती.
दुजाभाव केल्याचा आरोप
संघटनांच्या विरोधानंतरही नगर परिषदेने आपली भूमिका कायम ठेवत अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात केली आहे. या कारवाईदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष नासिर शेख यांनी नगर परिषदेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
नगर परिषदेकडून काही ठिकाणी दुजाभावाने, तर काही ठिकाणी संबंधित व्यक्तींचे तोंड पाहून कारवाई केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. काही अतिक्रमणधारकांना स्वतःचे अतिक्रमण काढण्यासाठी क्षणाचाही अवधी दिला जात नाही, तर काहींना दोन-दोन तासांचा वेळ दिला जात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
कारवाईकडे सर्वांचे लक्ष
नगर परिषदेला अतिक्रमण हटवायचेच असेल तर सर्वांवर समान पद्धतीने कारवाई करावी. कोणताही दुजाभाव न करता सर्व अतिक्रमणांवर एकसमान कारवाई करा, अशी मागणी नासिर शेख यांनी नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांकडे केली.
त्यामुळे आता लोणावळा शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेत नगर परिषद प्रशासन किती पारदर्शकता राखते आणि शहरातील सर्व अतिक्रमणांवर समान कारवाई करते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. तसेच या कारवाईला विरोध करणाऱ्या टपरी व पथारीधारक संघटनांची पुढील भूमिका काय असणार, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.





