Shirur News : अखेर पिंपरखेड येथील शेतरस्ता खुला; शिव पाणंद शेत रस्ते चळवळीच्या समन्वयाने मार्ग सुकर

शिरूर : शिरूर तालुक्यातील मौजे पिंपरखेड येथील बोंबे वस्तीवर जाणारा शेतरस्ता दीड वर्षांपासून वादग्रस्त ठरला होता. मात्र महसूलमंत्री व शासनाने शेतरस्ते खुले करण्याच्या मोहिमेसह शिव पाणंद शेत रस्ते चळवळीच्या पुढाकारामुळे अखेर हा शेतरस्ता खुला झाला. विशेष म्हणजे, सुरुवातीला मोठा विरोध असतानाही बिगर पोलिस बंदोबस्तात तणाव कमी करून प्रशासनाने व चळवळीच्या कार्यकर्त्यांनी समन्वय साधला.
तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी २६ सप्टेंबर रोजी या रस्त्याबाबत आदेश दिला होता. अर्जदाराने कोर्टात कॅव्हेट दाखल केले असतानाही तहसीलदारांचा आदेश अबाधित राहिला आणि महसूल यंत्रणेच्या कठोर भूमिकेमुळे व समन्वयकांच्या मध्यस्थीने रस्ता खुला करण्यास यश आले.
यावेळी मंडलाधिकारी राजेंद्र पोटकुले, ग्राम महसूल अधिकारी सुग्रीव मुंढे, कोतवाल सारिका वरे, शिव पाणंद शेत रस्ते चळवळीचे प्रणेते शरद पवळे, ॲड. सुप्रिया साकोरे, , ॲड. सागर जोरी, ॲड. योगेश बारहाते, पत्रकार रवींद्र खुडे
तसेच पिंपरखेड व चांडोह येथील पोलीस पाटील यांच्यासह वादी व प्रतिवादी शेतकरी आणि परिसरातील शंभराहून अधिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुरुवातीला शेतरस्ता खुला करण्यास विरोध झाला, मात्र शासन व महसूल यंत्रणेची ठाम भूमिका आणि चळवळीच्या समन्वयाने अनेक वर्षांपासून बंद असलेले दोन महत्त्वाचे रस्ते खुले झाले. त्यामुळे शेकडो एकर जमिनींच्या शेतीसाठी मोठा दिलासा मिळाला आहे.
विशेष म्हणजे, प्रतिवादी शेतकऱ्याच्या दाणे भरलेल्या उभ्या मका पिकाचे जेसीबीमुळे होणारे नुकसान होऊ नये म्हणून, शरद पवळे व चळवळीच्या कार्यकर्त्यांनी स्वतः दोन सऱ्या उपटून देत शेतकऱ्याला मदत केली. या संवेदनशील भूमिकेचे सर्व उपस्थित शेतकऱ्यांनी कौतुक केले.
रस्ता खुला झाल्यानंतर शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत शेतातच मासवडीचे जेवण देऊन सर्वांचा सत्कार केला. या सामूहिक आनंदसोहळ्याचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, नेटकर्यांनी शेतकऱ्यांच्या आनंदाला भरभरून प्रतिसाद दिला आहे.





