अखेर मिटलं ! जावेद अख्तर आणि कंगना रणावत यांनी खटले घेतले मागे

Javed Akhtar | Kangana Ranaut – गीतकार जावेद अख्तर आणि अभिनेत्री कंगना रणावत यांनी सुमारे पाच वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर शुक्रवारी मध्यस्थीद्वारे त्यांच्यातील मानहानीचा वाद मिटवला. दोघांनीही एकमेकांविरूद्ध दाखल केलेली अवमान याचिका मागे घेण्याबाबत तयारी दर्शविली.
वांद्रे येथील मुंबई महानगर अतिरिक्त मुख्य न्यायाधीश आशिष आवारी यांनी पुढाकार घेत दोघांमध्ये समेट घडवून आणला. न्यायाधीश आवारी यांच्या स्वाक्षरीने समेटबाबतचा न्यायालयीन आदेश जारी करण्यात आला.
कंगना राणावतने जावेद अख्तर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. शुक्रवारी मध्यस्थांच्या समोर झालेल्या बैठकीत कंगना राणावत, जावेद अख्तर व त्यांचे वकील अॅड रिझवान सिद्दीकी व अॅड जयकुमार भारद्वाज हे देखील उपस्थित होते.
या प्रकरणी मध्यस्थांनी दिलेल्या अहवालात या प्रकरणात दोन्ही बाजूंमध्ये समेट झाल्याचे समोर आले. त्यानंतर दोन्ही बाजूंनी प्रकरण मागे घेण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणी मध्यस्थांचा अहवाल व दोन्ही बाजूंशी संवाद साधल्यानंतर हे प्रकरण निकाली काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हे प्रकरण परस्पर सहमतीने मिटवण्याचा निर्णय दोन्ही पक्षांनी डिसेंबर 2024 मध्ये घेतला होता. त्यानंतर तब्बल 40 वेळा झालेल्या सुनावणीमध्ये कंगना अनुपस्थित होती. त्यामुळे फेब्रुवारी 2025 मध्ये झालेल्या सुनावणी दरम्यान जावेद अख्तर यांच्या वकिलांनी कंगना विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्याची मागणी केली होती.
मात्र, न्यायालयाने कंगनाला शेवटची संधी दिली होती. त्यानंतर शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान कंगना उपस्थित राहिली व दोन्ही पक्षांनी समेट करण्यास संमती दिली.





