अखेर गोखले कन्स्ट्रक्शन्सची माघार! ‘जैन बांधवांच्या भावनांचा आदर,’ म्हणत व्यवहार रद्द करण्याची प्रक्रिया सुरू

प्रभात वृत्तसेवा
पुणे – मॉडेल कॉलनी येथील सेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग जागेच्या व्यवहारादरम्यान आम्ही कोणतेही गैरकायदेशीर काम केलेले नाही. तेथे ५० हजार चौरस फुटांचे नवीन वसतिगृह बांधून देणे आणि तेथील जैन मंदिर आहे, तसे जतन करणे यासाठी आम्ही कटिबद्धता दर्शवली होती. परंतु, गेल्या काही दिवसांमधील घटनाक्रम बघता आम्ही यासंबंधी महत्वाचा निर्णय घेतल्याचा लेखी खुलासा गोखले कन्स्ट्रक्शन्स चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विशाल गोखले यांनी केला आहे.
प्रकल्पातून बाहेर पडण्याचा निर्णय..
या खुलाशात ते म्हणतात, तेथील मंदिर हे आमच्यासाठीही पूजनीय आहे. जैन बांधवांच्या मंदिराविषयी असलेल्या भावनांचा आम्हाला आदर आहे. त्यामुळे, सदर मंदीर आणि वसतिगृहाची इमारतीबाबत जैन धर्मियांच्या भावनांचा आदर करून आम्ही प्रकल्पातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सदर व्यवहार रद्द करण्याविषयीची कायदेशीर प्रक्रिया सुरु करावी, अशी विनंती करणारे पत्र आम्ही सेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग या ट्रस्टला इमेलच्या माध्यमातून पाठवले आहे.





