नवी दिल्ली – आजही भारतात मानसिक आरोग्याच्या समस्यांकडे पुरेशा गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. मन आजारी पडू शकते आणि व्यक्तीला काही मानसिक समस्या असू शकतात हेच मुळी आपल्या इथे मान्य केले जात नाही. बहुतेकवेळा मानसिक समस्यांचा संबंध व्यक्ती वेडी झाल्यापर्यंत जोडला जातो आणि त्यामुळेच मानसिक आजारांवर उपचार घेण्याबाबत लोकांमध्ये साशंकता असते आणि म्हणूनच कुटुंबातील कुणालाही मानसिक आजार झाला असेल तर तो लपवण्याकडे किंवा त्याच्यावर उपचार न करण्याकडे अनेकांचा कल असतो. आता हे चित्र काही प्रमाणात बदलू लागले आहे. मानसिक आजारांबाबत प्रसिद्ध व्यक्ती, सेलिब्रिटी खुलेपणाने बोलू लागले आहेत, त्याचबरोबर माध्यमातूनही याबाबत जागृती होत असल्याने आता किमान लोक मानसिक आजारांविषयी बोलू लागले आहेत. विशेष म्हणजे बॉलिवुडमधील काही चित्रपटांमध्येही हा विषय हाताळण्यात आलेला आहे. अशा चित्रपटांविषयी…
जजमेंटल है क्या – कंगना रनौतची 2019 मध्ये प्रदर्शित झालेला “जजमेंटल है क्या” हा चित्रपट मानसिक आजारांवर आधारीत आहे. जिच्या वडिलांनीच तिच्यावर अत्याचार केले आहेत अशा महिलेची कथा या चित्रपटात दाखवण्यात आलेली आहे. या घटनेचा तिच्या मनावर खोलवर परिणाम झालेला असतो आणि त्यामुळे सगळेच पुरूष जनावरांसारखे वागतात, असे तिचे मत झालेले असते. मानसिक आजारी व्यक्तीबाबत अनेकदा लोक वेड लागलयं का, अशा भाषेतच बोलत असतात. त्यामुळे चित्रपटाचे नावही त्यानुसारच जजमेंटल है क्या असे आहे.
कार्तिक कॉलिंग कार्तिक
2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या कार्तिक कॉलिंग कार्तिक चित्रपटातही हा विषय हाताळलेला आहे. हा चित्रपट दुभंग व्यक्तिमत्व आणि सिझोफ्रेनियावर आधारीत आहे. चित्रपटात अशा व्यक्तीची कथा आहे जो अंतर्मुखी म्हणजेच न बोलणारा किंवा कमी बोलणारा आहे, त्याच्याकडे आत्मविश्वासाचा अभाव आहे, कॉर्पोपेट जगात काम करतोय आणि स्वतःच्या भावाच्या मृत्यूला स्वतःला जबाबदार मानतोय. त्यासाठी तो मानसोपचार तज्ज्ञाची भेट घेतो. या चित्रपटात मानसिक आजाराची समस्या अतिशय प्रभावीपणे मांडली आहे. फरहान अख्तरने या चित्रपटात मुख्य भूमिका वठवलेली आहे.
डियस जिंदगी
अलिया भट आणि शाहरूख खानची भूमिका असलेल्या डियर जिंदगी चित्रपटातही मानसिक आजाराचा विषय थेटपणे मांडलेला आहे. या चित्रपटात लहान वयातच अलियाला तिचे आईवडील आजीच्या घरी राहण्यास ठेवतात कारण त्यांना त्यांच्या व्यवसायातून तिच्याकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. आजीकडे रहात असताना तिला आईवडिलांची अतिशय आठवण येते आणि ती त्यांना पत्रे लिहित राहते. तिच्या एकाही पत्राला आईवडिलांकडून उत्तर न मिळाल्याने ती अतिशय निराश होते. या सगळ्याचा परिणाम तिच्या रिलेशनशिपवरही पडतो. त्यासाठी मानसोपचार तज्ज्ञ असलेल्या शाहरूख खानला भेटते. त्यानंतर तिच्या आयुष्यात बदल घडतात.
अनजाना अनजानी
या चित्रपटातही नैराश्य आणि आत्महत्येसारख्या मानसिक आजारांवर भाष्य केलेले आहे. चित्रपटात रणबीर कपूरला व्यवसायात नुकसान होते. दुसरीकडे प्रियांका चोप्राचा तिच्या बॉयफ्रेंडने विश्वासघात केलेला असतो. दोघांच्यासमोरील या समस्यांमुळे दोघेही आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात.
हीरॉईन
हा चित्रपटात खरे तर चित्रपटसृष्टीतील कथा मांडण्यात आलेली आहे. माही अरोरा (करिना कपूर) ही एक अभिनेत्री असते. ती राग आणि चिंताक्रांत होण्यावर उपचार घेत असते. त्यामुळे चित्रपटसृष्टीत तिची प्रतिमा नुकसानकारक आणि अस्थिर प्रवृत्तीची अशी केली जाते आणि तसे लेबल तिला लावले जाते. मानसिक समस्यांमुळे तिच्या करिअरलाही उतरती कळा लागते असे चित्रपटात दाखवण्यात आले आहे.