काश्मिरात ‘फिल्मसिटी’ची योजना हवी; शिवसेनेचा भाजपला खोचक टोला

मुंबई – देशातील सगळ्यांत मोठी आणि सुंदर फिल्म सिटी उभारण्याचे वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केल्यानंतर एकच चर्चा सुरु झाल्या आहेत. यावर शिवसेनेने आपल्या मुखपत्र सामनातून भाजपवर निशाणा साधला आहे. खरं तर ‘370’ कलम हटवल्यानंतर केंद्राने ‘कश्मिरात’ अशा एखाद्या ‘फिल्मसिटी’ची योजना राबवायला हवी, असे शिवसेनेने म्हंटले आहे.
मुंबईस जगात किंवा देशात जे महत्त्व प्राप्त झाले त्यात सिनेउद्योगाचा वाटा महत्त्वाचा आहे. गेल्या काही महिन्यांपासून या मायानगरीस बदनाम करण्याचे, तिचे खच्चीकरण करण्याचे, त्यात काम करणाऱ्या प्रमुख मंडळींवर दाबदबाव टाकण्याचे प्रयोग सुरू झाले आहेत. जणू काही सिनेउद्योगाने व त्यात काम करणाऱ्या चमकदार मंडळींनी मुंबई सोडून जावे असे वातावरण निर्माण केले जात आहे काय, अशी शंका येऊ लागली आहे.
मायानगरीतले कलावंत, दिग्दर्शक, छायाचित्रणकार वगैरे मंडळींनी अभिनय कला सोडली असून ते ‘गर्दुल्ले’ बनले आहेत. कला वगैरे सोडून त्यांनी आपापल्या घरांच्या गॅलरीत व बाल्कनीत गांजा, अफूची बाग फुलवली आहे, असे एक विदारक चित्र पद्धतशीरपणे निर्माण केले जात आहे. बरं, याच चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा वापर पंतप्रधान मोदी व अनेक राज्यांनी आपापल्या राजकीय प्रतिष्ठेसाठी करून घेतलाच आहे.
मुंबईच्या चित्रपटसृष्टीतूनच निघालेल्या किरणांनी राज्यकर्त्यांना प्रकाशमान केले आहे. या चित्रपटसृष्टीच्या गळय़ास नख लावण्याचे प्रयत्न सुरू असतानाच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी महाराज यांनी त्यांच्या राज्यात ‘फिल्मसिटी’ उभारण्याचा संकल्प जाहीर केला आहे. मॉरिशस, श्रीलंका, उझबेकिस्तान या देशांनी येथील सिनेसृष्टीसाठी त्यांच्या देशात ‘रेडकार्पेट’ अंथरून स्वागत केले. चित्रीकरण व चित्रपटनिर्मितीसाठी विशेष सवलती दिल्या, पण काही किडुकमिडुक सोडले तर कुणी फार तेथे गेले नाही.
खरं तर ‘370’ कलम हटवल्यानंतर केंद्राने ‘कश्मिरात’ अशा एखाद्या ‘फिल्मसिटी’ची योजना राबवायला हवी. एकेकाळी आमच्या सिनेजगतास चित्रीकरणासाठी कश्मीर, सिमला, मनाली, शिलाँग अशा भागांची भुरळ पडली होती. ‘रोमॅण्टिक’ गाण्यांसाठी कश्मीर हे आवडते ठिकाण होते. तेथेही भव्य ‘फिल्मसिटी’ उभारता येईलच. शेवटी प्रत्येकाने हिंदुस्थानी सिनेसृष्टीत आपले योगदान दिलेच आहे. दादासाहेब फाळके व महाराष्ट्राने सिनेसृष्टीत सगळ्यांना सामावून घेतले. हा उद्योग मोठा केला. त्यावर आता चिखलफेक सुरू आहे. पण इतर राज्येही मुंबईप्रमाणे सिनेउद्योगास चालना देणार असतील तर त्यांना शुभेच्छा, असेही शिवसेनेने अग्रलेखात म्हंटले आहे.





