टी-20 विश्व विजयावर साकारणार चित्रपट

मुंबई -भारतीय क्रिकेटसाठी 24 सप्टेंबर हा दिवस अत्यंत अभिमानाचा ठरला आहे. 14 वर्षांपूर्वी याच दिवशी महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिला वहिला टी-20
विश्वकरंडक जिंकला होता. याच विजयी प्रवासावर क्रिकेट रसिकांना थक्क करणारा चित्रपट तयार होत असून, त्याचे लवकरच ओटीटीवर प्रदर्शन होणार आहे.
धोनीच्या नेतृत्वाखाली जो इतिहास भारतीय संघाने रचला त्याच सुवर्णक्षणांचे सादरीकरण प्रेक्षकांना मोहित करणार आहे. लंडनमधील वन वन सिक्स नेटवर्क लिमिटेडने या चित्रपटाचे
नामकरण हक से इंडिया असे केले आहे. हा चित्रपट व त्याला गुंफलेली कथा 2007 सालच्या भारतीय क्रिकेट संघाच्या टी-20 वर्ल्डकप विजयावर आधारित आहे.
वन वन सिक्स नेटवर्कचे सीईओ गौरव बहिरवानी आणि लंडनस्थित स्टॉक स्पेशालिस्ट जयदीप पंड्या यांनी या चित्रपटासाठी भागीदारी केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मुंबईचे दिग्दर्शक सौगता भट्टाचार्य करणार आहेत. या चित्रपटाला चक दे इंडिया फेम संगीतकार सलीम-सुलेमान हेच संगीत देणार आहेत.
1983 सालाने भारतीय संघाला प्रथमच विश्वविजेता बनवले आहे यात वाद नाही, परंतु 2007 सालाने जागतिक क्रिकेटमध्ये भारताच्या वर्चस्वाची मुहूर्तमेढ रोवली गेली. निर्मात्यांना केवळ हा चित्रपट नव्हे तर त्याचे शीर्षक गीतही प्रेक्षकांना भारावून टाकेल, असा विश्वास आहे.





