द्वेषाने भरलेले देशाच्या बदनामीची संधी सोडत नाहीत; मोदींचा नामोल्लेख टाळून राहुल यांच्यावर हल्लाबोल

अहमदाबाद : नकारात्मकता बाळगणारे काही लोक भारताच्या ऐक्याला आणि अखंडतेला लक्ष्य करत आहेत. द्वेषाने भरलेले ते लोक देशाच्या आणि गुजरातच्या बदनामीची एकही संधी सोडत नाहीत, असे टीकास्त्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोडले. त्यांनी कुणाचा नामोल्लेख केला नाही. मात्र, संबंधित वक्तव्यातून त्यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केल्याचे मानले जाते.
राहुल यांनी नुकताच अमेरिका दौरा केला. त्या दौऱ्यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर मांडलेल्या भूमिकेवर भाजपने टीकेची झोड उठवली. मोदींनी सोमवारी गुजरातमधील सभेत केलेल्या वक्तव्याला ती पार्श्वभूमी आहे. लांगूलचालनाचे राजकारण पुढे नेण्यासाठी विरोधक कुठलीही मर्यादा ओलांडू शकतात. आमच्या तिसऱ्या कार्यकाळातील १०० दिवसांच्या कालावधीवरून माझा अपमान करण्यात आला.
माझी खिल्ली उडवण्यात आली. मात्र, मी त्या कालावधीत विकासाचा अजेंडा निश्चित करण्यावर फोकस केला. देशाला पुढे नेण्याची इच्छा प्रत्येक नागरिक बाळगून आहे. भारताचा ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून जगभरात देशाचे प्रतिनिधित्व करावेसे प्रत्येक नागरिकाला वाटते. मात्र, काही लोकांची वर्तणूक त्याउलट आहे, असे मोेेदींनी म्हटले.
सरदार पटेलांनी अनेक संस्थानांचे देशाशी एकीकरण केले. मात्र, सत्तेचा हव्यास असणारे काही लोक देशाचे विभाजन करू इच्छित आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये राज्यघटनेचे कलम ३७० पुन्हा लागू करण्याची भाषा ते करत आहेत, अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली. भारतीयांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी मी आयुष्यातला प्रत्येक क्षण देईल. केवळ जनताच माझ्यासाठी भगवान आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.





