खालापूर – नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. १५ प्रभागांमधील ३१ जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आजपासून (दि. १०) सुरू होत असून सोमवारी (दि. १७) दुपारपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. नगरपालिकेच्या चौथ्या मजल्यावर स्थापन करण्यात आलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशासनाने या प्रक्रियेसाठी जय्यत तयारी केली असून, अर्ज दाखल करताना उमेदवारासोबत फक्त सूचक आणि एक अतिरिक्त व्यक्ती यांनाच कार्यालयात प्रवेश दिला जाणार आहे. तसेच, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयापासून शंभर मीटर परिसरात इतरांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. उमेदवारांसोबत जास्तीत जास्त तीन वाहनांनाच परिसरात प्रवेशाची परवानगी देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, राजकीय समीकरणांनाही खोपोली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेग आला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत एकत्र लढणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) या पक्षांमध्ये विधानसभेपासून सुरू असलेला संघर्ष अद्यापही कायम आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष आमनेसामने लढणार असल्याचे संकेत आहेत.