पिंपरी | प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज दाखल

पिंपरी, (प्रतिनिधी) – सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी वसुबारसचा मुहूर्त साधत आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी समर्थकांसह पदयात्रा काढत शक्तीप्रदर्शनही केले.
तर प्रमुख राजकीय पक्षांच्या नाराज इच्छुकांनीदेखील उमेदवारी अर्ज दाखल करत, बंडाचे निशाण रोवले आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी या बंडखोरांची भुमिका स्पष्ट होणार आहे.
पिंपरी विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदार व महायुतीचे अधिकृत उमेदवार आण्णा बनसोडे यांनी आपल्या समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल केला. तर महायुतीकडून तीव्र इच्छुक असलेल्या आरपीआयच्या महिला प्रदेशाध्यक्षा व माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे यांनीदेखील आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
याशिवाय कामगार नेते बाबा कांबळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या व्यतिरिक्त या मतदार संघामधून सुधीर लक्ष्मण जगताप (अपक्ष), सचिन महिपती सोनावणे-(अपक्ष), राजू सुदाम भालेराव (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) अण्णा दादु बनसोडे (राष्ट्रवादी कॉग्रेस,अजित पवार), चंद्रकांता लक्ष्मण सोनकांबळे (अपक्ष) बाबासाहेब किसन कांबळे व दादाराव किसन कांबळे यांनीदेखील उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
चिंचवड विधानसभा मतदार संघात भाजप शहराध्यक्ष व महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत खासदार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार श्रीरंग बारणे, अश्विनी जगताप, आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरख, बाळासाहेब ओव्हाळ हे उपस्थित होते. तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नाना काटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत, बंडाचा झेंडा रोवला आहे.
यावेळी त्यांच्यासोबत स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रशांत शितोळे, विनोद नढे, संतोष कोकणे, उषा काळे, हरिभाऊ तिकोणे, खंडुशेठ कोकणे, शिरीष साठे, शेखर चद्रंकात काटे, शाम जगताप, सचिन काळे, तानाजी जवळकर, नवनाथ नढे, चद्रकांत तापकीर,
बापु कातळे, विष्णु शेळके, सागर कोकणे, संगिता कोकणे, प्रशांत सपकाळ, सुमित डोळस, काळुराम कवितके यांच्यासह अनेक माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. याशिवाय चिंचवड मतार संघामधून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते भाउसाहेब भोईर यांनी आपल्या समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल केला.
चिंचवड विधानसभा मतदार संघामधून 11 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केली आहेत. त्यामध्ये अतुल गणेश समर्थ (अपक्ष), अॅड. अनिल बाबू सोनवणे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया), अश्विनी लक्ष्मण जगताप (भाजप), सतीश भास्कर काळे (स्वराज्य राष्ट्र निर्माण सेना), राजेंद्र मारूती काटे (अपक्ष), विनायक सोपान ओव्हाळ (अपक्ष), रुपेश रमेश शिंदे (अपक्ष), रविंद्र विनायक पारधे (अपक्ष) या उमेदवारांचा समावेश आहे.
दरम्यान भोसरी विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे, माजी आमदार विलास लांडे,
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे आदी उपस्थित होते.अजित गव्हाणे सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास लांडेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेत त्यांच्या चरणी नतमस्तक झाले. ग्रामदैवत भैरवनाथाचे दर्शन घेतले. त्यानंतर कार्यकर्त्यांसोबत अजित गव्हाणे पदयात्रा सुरू केली.





