तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून फसवणाऱ्या चार आरोपींना अटक

नवी दिल्ली – राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) भारतीय तरुणांना नोकरी देण्याच्या बहाण्याने परदेशात घेउन जाणाऱ्या चार प्रमुख आरोपींना अटक केली आहे, असे मंगळवारी अधिकृत निवेदनात एनआयए ने म्हटले आहे.
सोमवारी दिल्लीतून अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मंजूर आलम उर्फ गुड्डू, साहिल आणि आशिष उर्फ अखिल आणि पवन यादव उर्फ अफरोज उर्फ अफजल अशी आहेत.
ते भारतीय तरुणांना आकर्षक नोकऱ्या देण्याच्या बहाण्याने परदेशात पळवून नेण्यात गुंतलेल्या संघटित तस्करी करणाऱ्यांचा भाग होते, असे एनआयए च्या तपासातून समोर आले आहे.
भारतातील विविध भागांमध्ये असलेल्या ऑपरेटर्सद्वारे आणि परदेशी नागरिकांद्वारे चालवल्या जात असलेल्या मोठ्या नेटवर्कचा एक भाग म्हणून तस्करी झालेल्या तरुणांना लाओस, गोल्डन ट्रँगल , तसेच दक्षिण पूर्व आशियाई प्रदेशातील इतर ठिकाणी बनावट कॉल सेंटर्समध्ये काम करण्यास भाग पाडले जात होते, एजन्सीने केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या कॉल सेंटर्सद्वारे, तरुणांना गुंतवणूक घोटाळे, नातेसंबंध घोटाळे आणि क्रिप्टोकरन्सी संबंधी घोटाळे यांसारख्या बेकायदेशीर ऑनलाइन गुन्हे करण्यास भाग पाडले गेले, असे त्यात म्हटले आहे.
एनआयएने या वर्षी १९ जून रोजी दिल्ली पोलिसांकडून हे प्रकरण ताब्यात घेतले होते. आता अशा सर्व मानवी तस्करी सिंडिकेट्सचा नायनाट करण्यासाठी त्यांचा तपास सुरू ठेवला आहे.
मे महिन्यात, एजन्सीने संबंधित राज्य/केंद्रशासित प्रदेश पोलिसांच्या सहकार्याने सहा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील १५ ठिकाणी शोध घेतला.त्यात मानवी तस्करी आणि सायबर फसवणूक प्रकरणांमध्ये आठ नवीन एफआयआर नोंदवण्यात आल्या. त्यानंतर जूनमध्ये मुंबईतील अशाच एका प्रकरणात एनआयएने विदेशी नागरिकांसह पाच आरोपींवर आरोपपत्र दाखल केले होते.





