गौतमी पाटीलवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; काय आहे प्रकरण? वाचा…

सांगली – गौतमी पाटील हे नाव सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चांगलच चर्चेत आहे. त्यासोबत चर्चेत आहेत गौतमी पाटीलने केलेल्या डान्सचे व्हिडीओ आणि याच व्हिडीओमुळे आज गौतमी पाटील सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे. डान्स दरम्यान केलेलं अंगविक्षेप यामुळे गौतमीचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून, नेटकरी देखील तिच्या या व्हिडिओवर जोरदार कमेंटचा वर्षाव करत असतात.
दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय असलेली लावणी कलाकार गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांवर कायमस्वरुपी बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच मिरज तालुक्यातील बेडग येथील दत्तात्रय ओमासे याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तिच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी देखील केली आहे.
गेल्या महिन्यात मिरज तालुक्यातील बेडग येथे गौतमी पाटीलचा कार्यक्रम पार पडला. यावेळी तिचा कार्यक्रम पाहण्यासाठी लोक शाळेच्या छतावर आणि झाडांवरही चढले होते. तिचे अश्लील हावभाव पाहून धिंगाणा घालत होते. त्यावेळी दत्तात्रय ओमासे या तरुणाचा मृतदेह कार्यक्रमाच्या ठिकाणी आढळून आला असून, यावेळी मोठी खळबळ उडाली होती. मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.
आणि हाच मुद्दा धरून महाराष्ट्र राज्य राष्ट्र विकास सेनेचे युवक प्रदेश अध्यक्ष प्रशांत सदामते यांनी या कार्यक्रमांवर कायमस्वरुपी बंदी घालण्याची मागणी केली आहे. दरम्यान, याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. त्यामुळे गौतमी पाटील हिच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
सध्या सोशल मीडियावर गौतमी पाटीलच्या लावणीचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. घरामध्ये माता, भगिणी व लहान मुले-मुली असतात. त्यामुळे त्यांच्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. असं देखील यावेळी प्रशांत सदामते यांनी सांगितलं आहे.





