Fighter jet crashes in Haryana : हरियाणात फायटर जेट कोसळले; वायुदलाने दिले चौकशीचे आदेश

पंचकुला : हरियाणाच्या पंचकुला येथे मोरनीजवळ बालदवाला गावांत वायुदलाचे फायटर जेट जग्वार कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनाग्रस्त जग्वार जेट विमानाचा पायलट पॅराशुटच्या मदतीने खाली उतरल्याने तो सुखरूप आहे. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहचले. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश भारतीय वायू दलाने दिले आहेत. घटना स्थळी विशेष तज्ज्ञांची टीम देखील रवाना झाली आहे.
हा अपघात इतका भयानक होता की अपघातानंतर या विमानाचे तुकडे दूरपर्यंत विखुरले गेले आहेत. जग्वार फायटर जेट नियमित प्रशिक्षणाचे उड्डाण करीत होते. त्यानंतर अंबाला दरम्यान या जग्वार फायटरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते दुर्घटनाग्रस्त झाल्याचे भारतीय वायूसेनेने म्हटले आहे. पायलटने विमानाला सुरक्षित रूपाने गावाच्या दाट वस्तीच्या हद्दीबाहेर नेण्यात यश आल्याने मोठी जीवीतहानी टळल्याचे म्हटले जात आहे.
वायुसेनेने सोशल मीडिया प्लेटफॉर्म एक्सवर म्हटले की, भारतीय वायुसेनेचे एक जग्वार फायटर जेट विमान सिस्टीममध्ये दोष निर्माण झाल्याने क्रॅश झाले आहे. या अपघाताच्या घटनेचे सत्य बाहेर येण्यासाठी वायुसेने चौकशीचे आदेश दिले आहेत.





