सविंदणे येथे दूध संकलनाच्या पैशावरून हाणामारी; एक गंभीर जखमी

शिरूर: सविंदणे (ता. शिरूर) येथे दूध संकलनाच्या पैशाच्या वादातून दोन जणांना बेदम मारहाण झाल्याची घटना बुधवारी (दि. १७) सायंकाळी घडली. यात सुनिल बाळासाहेब पडवळ (वय ४५) गंभीर जखमी झाले असून, शिरूर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
फिर्यादीनुसार, सुनिल पडवळ यांचा दूध संकलनाचा व्यवसाय असून, त्यांनी संतोष पांडुरंग मेचे यांना उचल म्हणून पैसे दिले होते. पैसे परत मागितल्याने संतोष मेचे व त्यांच्या दोन मुलांनी, सोहम आणि देवांश यांनी सुनिल व त्यांचा चुलत भाऊ सचिन पडवळ यांना लोखंडी रॉड, लाकडी दांडके व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.
ही घटना गावातील जुन्या ग्रामपंचायत इमारतीसमोर घडली. फिर्यादीनंतर पोलिसांनी संतोष, सोहम आणि देवांश मेचे यांच्यावर गुन्हा दाखल केला. तपास सहाय्यक फौजदार प्रशांत गायकवाड करीत असून, घटनेने गावात तणाव निर्माण झाला आहे.





