‘पावणेबारा कोटी रु. द्या, नाहीतर डाटा हॅक करू’; बजाज फायनन्सचे संजीव बजाज यांना धमकी

पुणे – बजाज फायनन्स कंपनीचे संजीव बजाज यांच्याकडे ई-मेलद्वारे 11 कोटी 63 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. खंडणी न दिल्यास कंपनीचा सर्व डाटा हॅक करुन मोठे नुकसान करण्याची धमकी दिली. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात ई-मेल धारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी कंपनीतर्फे युवराज मोरे (32, रा. हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीचे वरिष्ठ अधिकारी संजीव बजाज, दीपक रेड्डी, दीपक बजारी आणि संजीव जैन यांच्या [email protected] या ई-मेल आयडीवरुन मेल पाठवण्यात आला आहे.
यामध्ये DOGE COIN चलनाच्या माध्यमातून 11 कोटी 63 लाख 29 हजार 217 रुपये डोजे कॉइन ऍड्रेसवर पाठवण्यास सांगण्यात आले होते. हा मेल 28 नोव्हेंबर 2021 रोजी पाठवण्यात आला होता. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला गेला होता. तपास पोलीस निरीक्षक मंगेश जगताप करत आहेत.
क्रिप्टो करन्सीचा उपयोग
डोजे कॉइन ही क्रिप्टो करन्सी आहे. ती परदेशातील दोन संगणक अभियत्यांनी बनवली आहे. डोजे कॉइनच्या माध्यमातून 7395373 इतकी रक्कम मागण्यात आली आहे. याची भारतीय चलनात 11 कोटी 63 लाख 29 हजार 217 रुपये इतकी किंमत होते.




