fertilizer price hike: शेतकरी दुहेरी संकटात! एकीकडे पाऊस गायब; तर दुसरीकडे खतांच्या किमतीत १० टक्क्यांहून अधिक वाढ
fertilizer price hike: आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे खतांचे दर भडकले; पूर्वमशागत करूनही शेतकरी पावसाच्या आणि पैशांच्या चिंतेत.

fertilizer price hike – रासायनिक खते, बियाणांच्या किमती आणि मजुरीचे दर वाढल्याने, शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे खतांच्या दरात दहा टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाल्याने, उत्पादन खर्चातही वाढ झाल्याने, शेतकर्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. शासनाने खतांच्या कमाल किरकोळ किमतीला मर्यादा घालावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
युरियाचे दर कमी असल्याने, शेतकरी युरियाचा वापर गरजेपेक्षा अधिक करत असल्याचे दिसून येते. मात्र, युरियाच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत बिघडत आहे. डीएपी, युरिया वगळता इतर रासायनिक खतांचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे खरीप हंगामात शेती कशी करायची, असा प्रश्न शेतकर्यांसमोर उभा आहे. गतवर्षीच्या तुलनेत खतांच्या दरामध्ये एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकर्यांनी शेतीची पूर्वमशागत केली आहेत.
पेरणीनंतर पिकांच्या वाढीसाठी खतांची मात्रा देणे अत्यंत गरजेचे असते. त्यामुळे खत खरेदीसाठी शेतकरी बाजारात येत आहेत. गतवर्षी अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले. आता तर अनेक शेतकर्यांकडे खरिपाच्या पेरण्यांसाठी पैसे नाहीत. त्यातच जून महिना संपत आला तरी पावसाचा पत्ता नसल्याने, शेतीचे आर्थिक गणित कसे सोडवायचे, असा प्रश्न शेतकर्यांपुढे आहे.





