Maharashtra monsoon update : रखडलेला मान्सून पूर्वपदावर कधी येणार? IMDने दिली महत्त्वाची अपडेट; ‘या’ जिल्ह्यांना आज वादळी पावसाचा इशारा
Maharashtra monsoon update : हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मंगळवारनंतर मान्सून महाराष्ट्रात वेगाने पुढे सरकेल. परिणामी 8 जूनपासून रखडलेली मान्सूनची प्रगती पुढील आठवड्यात पुन्हा सुरू होण्याची चिन्हे आहेत.

Maharashtra monsoon update : राज्यातील नागरिकांना पावसासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, पुढील चार दिवस राज्यात पावसाची शक्यता कमी असून अनेक भागांमध्ये उष्ण आणि दमट हवामान कायम राहणार आहे.
मात्र, मंगळवारपासून मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून 1 जुलैपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनमुळे व्यापला जाईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मंगळवारनंतर मान्सून महाराष्ट्रात वेगाने पुढे सरकेल. परिणामी 8 जूनपासून रखडलेली मान्सूनची प्रगती पुढील आठवड्यात पुन्हा सुरू होण्याची चिन्हे आहेत. तर कोकण विभाग वगळता राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उष्ण व दमट हवामानाचा प्रभाव जाणवणार आहे. यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर राज्यातील इतर भागांत ढगाळ वातावरणासह उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी पडू शकतात.
दरम्यान, मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी आवश्यक वातावरण तयार होत असून त्याने आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहार आणि झारखंडच्या काही भागांमध्ये प्रगती केली आहे. मंगळवारपर्यंत महाराष्ट्रासह तेलंगणा, ओडिशा, झारखंड, बिहारचा उर्वरित भाग आणि छत्तीसगडच्या काही भागांत मान्सून दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. यामुळे जुलैच्या सुरुवातीपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या जिल्ह्यांमध्ये उष्ण व दमट हवामानाची शक्यता (येलो अलर्ट)
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नाशिक, अहिल्यानगर, अकोला, वर्धा, चंद्रपूर.
या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.






