सातारा: ‘झेडपी’तील 3 विभाग ‘बडीशेप’मुळे धास्तावले: टेबलावर दररोज ढीग; जादूटोण्याची चर्चा

सातारा – सातारा जिल्हा परिषद गेल्या तीन दिवसांपासून बडिशेपमुळे धास्तावलेली आहे. जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणीपुरवठा,
ग्रामीण विकास यंत्रणा व टाऊन प्लॅनिंग या विभागासमोरील टेबलावर दररोज बडिशेपचे ढीग लागल्याचे दिसत आहे. दररोज कर्मचारी साफसफाई करुनही दुसऱ्या दिवशी बडिशेप दिसतच आहे. हा प्रकार अंधश्रद्धा व जादुटोण्याचा तर नाही ना? अशी चर्चा परिसरात सुरु झाली आहे. दरम्यान प्रशासन मात्र या प्रकाराबद्दल अनभिज्ञ असल्याचेच दिसत आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य ईमारतीच्या मागील बाजूला असणाऱ्या दुसऱ्या इमारतीत अनेक विभाग आहेत. गेल्या तीन दिवसांपासून अंधश्रद्धा, करणी करण्याचे प्रकार या इमारतीत सुरु असल्याची चर्चा आहे.
झेडपीत स्वच्छता व पाणीपुरवठा विभाग तळपजल्यावर आहे, दुसऱ्या मजल्यावर ग्रामविकास यंत्रणा व लगतच टीपी विभाग आहे. या ठिकाणी तीन दिवसांपासून बडिशेपचे गौंडबंगाल सुरु आहे. या विभागांच्या बाहेरील टेबलावर बडीशेपचे ढीग लागल्याचे दिसून येत आहे. दररोज साफसफाई करुनही ही बडीशेप दुसऱ्या दिवशी टेबलावर दिसतच आहे. या प्रकारामुळे संबंधित विभागातील कर्मचार्यांमध्ये अंधश्रद्धेपोटी हा प्रकार करत असल्याची चर्चा आहे.
प्रशासनाची डोळेझाक –
जिल्हा परिषद कार्यालय व परिसरात अंधश्रद्धेचा प्रकार सुरु असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र, हा प्रकार जिल्हा परिषद प्रशासनाने गंभीरपणे घेतल्याचे दिसून येत नाही. याबाबत सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्याचे कष्ट प्रशासनाने घेतले नाही. त्यामुळे या प्रकाराबाबत प्रशासनाला गांभीर्य दिसत नाही.




