पिंपरी | शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी आणि मार्गदर्शकांचा सत्कार

कार्ला, (वार्ताहर) – पंचायत समिती मावळच्या शिक्षण विभागाकडून २०२३-२४ वर्षातील शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादी आणि जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये स्थान पटकाविलेल्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी आणि त्यांचे मार्गदर्शक शिक्षक, केंद्रप्रमुख यांचा सत्कार पंचायत समितीच्या सभागृहामध्ये संपन्न झाला.
कार्यक्रमासाठी माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, सहाय्यक गटविकास अधिकारी संताजी जाधव, गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज, विस्तार अधिकारी शोभा वहिले आदी मान्यवर उपस्थित होते. एकूण ३८ शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, २५ मार्गदर्शक शिक्षक आणि २६ पालक यावेळी उपस्थित होते.
गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. गुलाबराव म्हाळसकर यांनी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी आणि शिक्षकांचे कौतूक केले. तसेच पालकांनाही पाल्याच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावेत आणि गुणवत्ता यादीत दरवर्षी वाढ व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
सुधीर भागवत यांनी चांगले यश संपादित केल्याबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी मार्गदर्शक शिक्षक श्रीकांत दळवी यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आला. ज्योती लावरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शोभा वहिले यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुहास धस, निर्मला काळे आदींनी प्रयत्न केले.





