फेडरल रिझर्व्हची नकारघंटा; वाढलेल्या महागाईमुळे व्याजदर कपात मंदावणार

मुंबई – अमेरिकन अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढण्यासाठी फेडरल रिझर्व्हने दोन महिन्यापूर्वी आक्रमक व्याजदर कपात करण्याचे धोरण जाहीर केले होते. यामुळे अमेरिकेसह विविध देशातील शेअर बाजाराचे निर्देशांक विक्रमी पातळीवर गेले होते. मात्र एकूण परिस्थिती पाहता अमेरिकन महागाई आता प्रदिर्घ काळ मुक्काम ठोकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत 2025 मध्ये केवळ दोन वेळा व्याजदर कपात करण्याची परिस्थिती निर्माण होईल, असे फेडरल रिझव्हर्र्चे अध्यक्ष जेरोम पावेल यांनी सांगितले.
या कारणामुळे अमेरिकन शेअर बाजाराचे निर्देशांक कोसळले. त्याचा परिणाम इतर सर्व देशाबरोबरच भारतीय शेअर बाजार निर्देशांकावरही झाला. अमेरिकेच्या पतधोरण समितीने गुरुवारी पाव टक्के व्याजदरात कपात केली. ही कपात अपेक्षित होती. मात्र आगामी वर्षात चार ऐवजी फक्त दोन वेळा व्याजदर कपात होण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट करण्यात आले. गेल्या दोन महिन्यात अमेरिकेने दोन टप्प्यात पाऊण टक्क्याची व्याजदर कपात केली आहे.
पुढील वर्षात आणखी एक टक्का व्याजदर कपात होण्याची अपेक्षा होती. मात्र ती फार तर अर्धा टक्के होईल असे समजले जात आहे. अशा परिस्थितीत भांडवल सुलभतेवर परिणाम होणार आहे. याचा परिणाम फक्त अमेरिकेच्या विकासदरावरच नाही तर इतर देशातील गुंतवणुकीवर ही होऊ शकतो असे गुंतवणूकदारांना वाटत आहे. त्याचबरोबर कपात कमी होणार आहे. त्यामुळे अमेरिकेचा विकासदर मंदावणार आहे.
अशा परिस्थितीत जागतिक व्यापारावर परिणाम होऊ शकतो असे गुंतवणूकदारांना वाटत आहे. युरोपियन देश आणि चीनची आर्थिक परिस्थितीही अमेरिकेसारखीच मंद आहे. त्यामुळे शेअर बाजारातून जास्त परतावा मिळण्याची शक्यता कमी असल्याचे गुंतवणूकदार वाटत आहे. मात्र अमेरिकेच्या या बचावात्मक पतधोरणानंतर डॉलर मजबूत होत आहे. अमेरिकेच्या कर्जरोख्यावरील परतावा वाढत आहे. आता या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प काय करतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. मात्र त्यांचे धोरण अस्थिर आणि विश्वासार्ह नसते. हा गुंतवणूकदाराच्या दृष्टिकोनातून चिंतेचा विषय आहे.





