Satara: गोडोलीतील अतिक्रमण हटाव मोहिमेला वेग, सातारा पालिका ॲक्शन मोडवर; १५ फलक हटवले
Satara बहुतांश अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, त्यानंतर आता प्रत्यक्ष कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Satara: शहरातील रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी पालिकेने सुरू केलेल्या मोहिमेला आता हळूहळू वेग येऊ लागला आहे. गोडोली येथील साईबाबा मंदिर ते जकात नाका परिसरात मंगळवारी सकाळी अतिक्रमण हटाव पथकाने धडक कारवाई केली. गोडोली चौकातील जुना जकात नाका तसेच रस्त्यालगत कोसळण्याच्या स्थितीत असलेले जुने झाड तातडीने हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला.
मुख्याधिकारी विनोद जळक यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण निरीक्षक प्रशांत निकम यांच्या नेतृत्वाखाली पाच ते सहा कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली. कारवाईदरम्यान रस्त्यालगत उभारण्यात आलेले लोखंडी बोर्ड, जाहिरात फलक आणि वाहतुकीला अडथळा ठरणारे साहित्य हटविण्यात आले. मोहिमेच्या दुसऱ्याच दिवशी तब्बल १४ ते १५ लोखंडी बोर्ड हटविण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडी, पादचाऱ्यांची गैरसोय तसेच अपघाताचा धोका वाढत असल्याने पालिकेने अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावून अतिक्रमणे स्वतःहून काढून घेण्याचे निर्देश दिले आहेत. बहुतांश अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, त्यानंतर आता प्रत्यक्ष कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे.
दरम्यान, सध्या पालिकेच्या पथकाकडून प्रामुख्याने रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेले किरकोळ लोखंडी बोर्ड आणि फलक हटविण्याची कार्यवाही सुरू आहे. मात्र, शहरातील मोठ्या व कायमस्वरूपी अतिक्रमणांवर कधी आणि कितपत कठोर कारवाई केली जाणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
‘फलकां’पुरतीच कारवाई नको!
गोडोली परिसरातील कारवाईमुळे रस्ता काही प्रमाणात मोकळा झाला असला तरी शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर अद्याप अतिक्रमणांचे जाळे कायम आहे. त्यामुळे केवळ किरकोळ फलक हटविण्यापुरती मोहीम मर्यादित न ठेवता रस्ते, पदपथ आणि चौक व्यापणाऱ्या मोठ्या अतिक्रमणांवरही पालिकेने धडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेचा वेग वाढवून ती सातत्याने राबविण्याची गरज आहे.





