Pune News : गणेशोत्सवाच्या तोंडावर FDA चा दणका! पुण्यात ४ ट्रक पनीर-खवा जप्त
Pune News : प्रयोगशाळेतील तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणात पुढील कारवाई केली जाणार आहे.

पुणे : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असताना अन्न व औषध प्रशासन विभागाने पुण्यात मोठी कारवाई केली आहे. बुधवारी पेठ परिसरात कारवाई करत तब्बल चार ट्रक पनीर आणि खव्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात हा साठा आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मोठ्या प्रमाणातील खाद्यपदार्थांचा साठा असल्याने कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. जप्त करण्यात आलेल्या पनीर आणि खव्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
प्रयोगशाळेतील तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणात पुढील कारवाई केली जाणार आहे. तोपर्यंत जप्त केलेल्या खाद्यपदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.
तुकाराम मुंढेंच्या मार्गदर्शनाखाली ‘झिरो टॉलरन्स’ मोहीम
महाराष्ट्र FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर भेसळखोरांविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ मोहीम राबवली जात आहे. पुण्यातील ही कारवाई त्याच मोहिमेचा एक भाग असल्याचे सांगण्यात येत आहे.
गणेशोत्सवासह आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाकडून खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत विशेष खबरदारी घेतली जात आहे. सणासुदीच्या काळात भंडारा, महाप्रसाद किंवा सामूहिक अन्नवाटपाचे आयोजन करणाऱ्यांसाठी प्रशासनाने मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत.
अन्नवाटपाच्या कार्यक्रमासाठी ७ दिवस आधी पूर्वसूचना आवश्यक
सामूहिक अन्नवाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी किमान ७ दिवस अगोदर अन्न व औषध प्रशासनाला पूर्वसूचना देणे आवश्यक करण्यात आले आहे.
तसेच मिठाई विक्रेत्यांना खवा आणि पनीर खरेदीची मूळ बिले जतन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. खाद्यपदार्थांवर एक्सपायरी डेट आणि ‘बेस्ट बिफोर’ची माहिती असलेले लेबल असणेही आवश्यक आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर थेट फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
स्वच्छता आणि अन्न सुरक्षेच्या नियमांचे पालन बंधनकारक
सणासुदीच्या काळात अन्न व्यवसाय चालकांनी स्वच्छता आणि अन्न सुरक्षेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. यामध्ये सुरक्षित पाण्याचा वापर, अन्न योग्य तापमानावर ठेवणे, कच्चे आणि शिजवलेले अन्न वेगवेगळे ठेवणे, अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैयक्तिक स्वच्छता तसेच खाद्यपदार्थांची सुरक्षित साठवणूक यांचा समावेश आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात करण्यात आलेल्या या मोठ्या कारवाईनंतर आता प्रयोगशाळेच्या अहवालाकडे लक्ष लागले आहे. अहवालानंतर संबंधितांवर कोणती कारवाई होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.





