IOA vs CAG Report : भारतीय ऑलिम्पिक संघटनेने स्वतःचेच केले नुकसान…? कॅगच्या अहवालात दावा…

IOA vs CAG Report : – भारतीय ऑलिम्पिक संघटनेवर (आयओए) स्वतःचेच नुकसान झाल्याचा आरोप आहे. कॅगच्या अहवालातून हा आरोप समोर आला आहे. आयओएने 2022 ते 2030 या कालावधीत होणाऱ्या 10 मेगा इव्हेंटच्या प्रायोजकत्वासाठी रिलायन्ससोबत करार केला होता. या मेगा इव्हेंट्समध्ये दोन समर ऑलिंपिक (2024 आणि 2028), दोन आशियाई गेम्स (2022 आणि 2026), दोन राष्ट्रकुल गेम्स (2022 आणि 2026) तसेच दोन विंटर ऑलिंपिक (2026 आणि 2030) आणि दोन युथ ऑलिंपिक (2026 आणि 2030) यांचा समावेश आहे.
कॅगच्या म्हणण्यानुसार, आयओएला संपूर्ण करारासाठी 59 कोटी रुपये मिळायला हवे होते, परंतु ते केवळ 35 कोटी रुपये मिळाले.
अहवालात पुढे म्हटले की, 2022 मध्ये जेव्हा रिलायन्ससोबतचा करार निश्चित झाला तेव्हा दोन विंटर ऑलिंपिक आणि दोन युथ ऑलिंपिक त्यात समाविष्ट करण्यात आले नव्हते. त्यानंतर आयओएने 6 मेगा इव्हेंटसाठी 35 कोटी रुपयांचा करार केला होता. एका कार्यक्रमासाठी सुमारे 6 कोटी रुपयांची रक्कम निश्चित करण्यात आली होती.
2023 मध्ये आणखी चार कार्यक्रमांसाठी हा करार वाढविण्यात आला आहे, परंतु यासाठी कोणतेही अतिरिक्त पैसे आकारले गेले नाहीत. यापैकी प्रत्येकी 6-6 कोटी रुपये अधिक दिले पाहिजे होते. म्हणजे 24 कोटी रुपये जास्त मिळायला हवे होते. तसे झाले नाही. आयओएने 59 ऐवजी 35 कोटी रुपये घेतले. या प्रकरणी कॅगने आयओए अध्यक्ष पीटी उषा यांच्याकडून उत्तर मागितले आहे.
ऑलिम्पिकदरम्यान करार पाळला गेला नाही
आयओएचे अधिकारी अजय कुमार नारंग यांनी याप्रकरणी असोसिएशनची बाजू मांडली आहे. निविदेत त्रुटी राहिल्याने करारावर फेरनिविदा काढावी लागल्याचे त्यांनी सांगितले. मुख्य प्रायोजक ऑलिम्पिकदरम्यान इंडिया हाऊस बांधू शकतील आणि त्याचे नाव स्वतः ठेवू शकेल, असे करारात लिहिले होते. म्हणजे इंडिया हाऊसचे नाव रिलायन्स इंडिया हाऊस झाले असते. पण नंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) नियम बदलले. देशाच्या घराच्या नावासह प्रायोजकाचे नाव वापरण्यास बंदी घातली गेली, त्यामुळे करार मोडला गेला. रिलायन्सने 6 इव्हेंटसाठी 35 कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी केली होती जेणेकरून ती इंडिया हाऊससोबत आपले नाव वापरू शकेल. हा अधिकार काढून घेतल्यावर रिलायन्सने भरपाई मागितली.
Women’s T20 World Cup 2024 : टीम इंडियानं पुन्हा मारलं मैदान, पाकचा 6 विकेट्स राखून केला पराभव…
भरपाई म्हणून चार कार्यक्रम
या भरपाईचा भाग म्हणून त्यांना आणखी चार अतिरिक्त कार्यक्रम देण्यात आले. यामध्ये दोन विंटर ऑलिम्पिक आणि दोन युथ ऑलिम्पिक गेम्सचा समावेश आहे. नारंग म्हणाले, विंटर ऑलिम्पिक आणि युथ ऑलिम्पिकची लोकप्रियता भारतात फारशी नाही हेही पाहायला हवे. त्यामुळे या स्पर्धांच्या प्रायोजकत्वाची रक्कम समर ऑलिम्पिक किंवा आशियाई गेम्सइतकी असू शकत नाही.





