Antim Panghal : अंतिम पंघाल भारतात परतली, माध्यमांशी न बोलताच सोडले दिल्ली विमानतळ…

Antim Panghal & Indian Olympic Association :- हरियाणाची महिला कुस्तीपटू अंतिम पंघाल शुक्रवारी सकाळी पॅरिस सोडण्याचे आदेश दिल्यानंतर भारतात परतली. दिल्ली विमानतळावर पोहोचल्यावर क्रीडाग्राममध्ये झालेल्या वादाबद्दल पंघालशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, तिने बोलण्यास नकार देत ती आपल्या कुटुंबासह कारमधून निघून गेली.
मुलगी दु:खी होती, त्यामुळे कोणाशीही न बोलता निघून गेल्याचे वडील रामनिवास पंघाल यांनी सांगितले. घरी आल्यावर तिचे जंगी स्वागत केले जाईल, असेही ते म्हणाले.
वास्तविक, पॅरिसमधील ऑलिम्पिक क्रीडानगरीमध्ये पंघालच्या बहिणीला पोलिसांनी पकडले होते. तिच्याकडे अंतिमचे आय-कार्ड सापडले. यानंतर पोलिसांनी तिला पोलिस ठाण्यात नेले आणि तिची चौकशी केली. तेथेच पोलिसांनी अंतिमचीही चौकशी केली. यानंतर दोघींना तातडीने पॅरिस सोडण्याचे आदेश देण्यात आले होते.
प्रशिक्षकासह सर्वांवर कारवाई?
या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या (आयओए) अधिकाऱ्यांनी, या मुद्द्यावर सर्वांनाच लाज वाटली आहे. प्रशिक्षकासह सर्वांवर 3 वर्षांची बंदी घालण्याचा विचार केला जात आहे, अशी प्रतिक्रीया दिली आहे. मात्र, याआधी आयओएने अंतिमवर कोणतीही बंदी घालण्यात आली नसल्याचे सांगितले होते. परंतू आता, आयओएने अंतिम पंघालवर कारवाई केल्यास तिच्या अडचणी वाढू शकतात.





