लोणावळा : बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी आणि हृदय पिळवटून टाकणारी एक घटना समोर आली आहे. मावळ तालुक्यातील लोणावळा शहराजवळील एका गावात जन्मदात्या पित्यानेच आपल्या १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी असलेल्या आरोपीची पत्नी तथा पीडितेची आई यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २० जून २०२५ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही अमानुष घटना घडली. कुसगाव बुद्रुक गाव हद्दीत राहत्या घरात पीडित मुलगी एकटी असताना तिच्या पित्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. आरोपीला आपली मुलगी अल्पवयीन असल्याची पूर्ण कल्पना होती, तरीही त्याने दोन वेळा तिच्यावर अत्याचार केला. ही किळसवाणी घटना कोणालाही न सांगण्यासाठी त्याने मुलीला मारण्याची धमकीही दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास म.स.पो.नि. विजया म्हेत्रे करीत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.